अज्ञात मोबाईलधारकाविरोधात गुन्हा दाखल
पणजी : कॉईन डेक्स कंपनीचा अधिकारी असल्याचे सांगून जादा मोबदला देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर गुंतवणूक करण्यास भाग पाडून ९.६५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी सायबर विभागाने अज्ञात मोबाईलधारकाविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
सायबर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी सांतइस्तेव येथील फ्रान्सिस आफोन्सो यांनी तक्रार दाखल केली. त्यानुसार, १८ ते २२ डिसेंबर २०२३ दरम्यान तक्रारदाराला अज्ञात व्यक्तीने कॉईन डेक्स कंपनीचा अधिकारी असल्याचे सांगितले. त्यानंतर मोबाईलवर संपर्क साधून जादा व्याज देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानुसार, तक्रारदाराला टेलेग्रामच्या विविध ग्रुपमध्ये सहभागी होण्यास लावले. तसेच त्या ग्रुपवर विविध स्पर्धेत सहभाग घेण्यास लावले. त्यानुसार, तक्रारदाराला पेटीएम, यूपीआय तसेच बँक खात्यात मिळून ९.६५ लाख रुपये जमा करण्यास भाग पाडून फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद केले.
याची दखल घेऊन पोलीस निरीक्षक सतीश पडवळकर यांनी भादंसंच्या ४१९, ४२० व आरडब्ल्यू ३४ आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६६ डी अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.