जमीन विकसित करण्याच्या नावाखाली ६० लाखांचा गंडा

जमीन मालकासह दोन कंपन्यांविरोधात म्हापसा पोलिसांत गुन्हा दाखल

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
11th February, 11:59 pm
जमीन विकसित करण्याच्या नावाखाली ६० लाखांचा गंडा

पणजी : कळंगुट येथील सर्व्हे क्र. १४०/९ मधील २,०७५ चौ. मी. जमीन भागीदारी पद्धतीने विकसित करण्यासाठी ६० लाख रुपये जमा करण्यास भाग पाडून तिसऱ्याच कंपनीला विक्री केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी जमीन मालक एव्हरल्डा मर्लेन डिमेलो यांच्यासह दरिसा बिल्डर्स प्रा. लि. आणि प्रिन्स डेव्हलपर्स या कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी ऋतूराज जाधव यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, संशयित डिमेलो यांनी कळंगुट येथील सर्व्हे क्र. १४०/९ मधील २,०७५ चौ.मीटर जमीन विकसित करण्यासाठी नामदेव हांडे आणि आत्माराम लिंबाजी पाटील यांच्याकडे भागीदारी करून खरेदी करायला लावली. त्यासाठी डिमेलो यांनी त्यांच्याकडून ६० लाख रुपये घेतले. त्यानंतर डिमेलो यांनी वरील जमीन प्रिन्स डेव्हलपर्स यांना विक्री करून त्यांना विकसित करण्यास सांगितले. त्यानुसार, वरील भागीदाराने पैसे मागितले असता, ते परत करण्यास नकार दिला. त्यानुसार, पाटील आणि हांडे यांच्यातर्फे ऋतूराज जाधव यांनी म्हापसा पोलीस स्थानकात जमीन मालक आणि वरील कंपनींविरोधात फसवणूक केल्याची तक्रार दखल केली. याची दखल घेऊन सीताकांत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश मांद्रेकर यांनी डिमेलो यांच्यासह वरील कंपन्यांविरोधात भादंसंच्या कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.