यजमान एफसी गोवा टेबल टॉपर

केरळा ब्लास्टर्स एफसीचा पराभव : रोवलिन बोर्जेसचा निर्णायक गोल

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
04th December 2023, 12:00 am
यजमान एफसी गोवा टेबल टॉपर

मडगाव : इंडियन सुपर लीग २०२३-२४ (आयएसएल) मधील दोन अव्वल संघ समोरासमोर असल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. यजमान एफसी गोवा आणि केरळा ब्लास्टर्स एफसी यांनी तोडीसतोड खेळ केला. परंतु, सामन्याचा निकाल हा यजमान एफसी गोवा संघाच्या बाजूने लागला. रोवलिन बोर्जेसच्या एकमेव गोलच्या जोरावर १९ गुणांसह एफसी गोवाने अव्वल स्थान पटकावले. केरळा ब्लास्टर्स १७ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर घसरले.
एफसी गोवा त्यांच्या घरच्या मैदानावर खेळत असल्याने त्यांचे पारडे जड मानले जात होते. परंतु, केरळा ब्लास्टर्सने आक्रमणाने सुरुवात केली. केरळा ब्लास्टर्सकडून तिसऱ्या व सहाव्या मिनिटाला अनुक्रमे बोरिस सिंग व दानिश फारुकनचा प्रयत्न अडवला गेला. फारूकने एफसी गोवाच्या बचावफळीला चकवा दिला आणि गोलरक्षकालाही गडबडून टाकले होते. पण, फारुकने टोलवलेला चेंडू गोलजाळीच्या काही इंचावरून बाहेर गेला अन् यजमानांच्या चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. ८व्या मिनिटाला क्वाने पेप्राहचा प्रयत्न थोडक्यात हुकला, यातही दानिशने मदत केली होती. १३व्या मिनिटाला नोआ सदौईने गोलपोस्टच्या तोंडावर चेंडू व्हिक्टर रॉड्रीगेजकडे सोपवला होता. परंतु, त्याचा हा प्रयत्न ब्लास्टरच्या हॉर्मिपाम रुईवाहने हेडरद्वारे बाहेर टाकला.


एफसी गोवाकडून सातत्याने आक्रमण होऊ लागले होते. परंतु, केरळा ब्लास्टर्सचा गोलरक्षक सचिन सुरेश यानेही अप्रितम बचाव केला. १८व्या मिनिटाला सदौईचा बरोबर गोलमध्ये जाणारा चेंडू सचिनने पुढे येऊन स्वतःला पूर्णपणे स्ट्रेच करून रोखला. २०व्या षटकात गोवा संघाकडून रोवलिन बोर्जेसचा प्रयत्न थोडक्यात हुकला. मधल्या टप्प्यात खेळ थोडा मंदावला होता आणि दोन्ही खेळाडूंनी जोखीम न उचलता पहिला हाफ संपवण्यावर भर दिला. ४०व्या मिनिटाला संदेश झिंगनने अगदी जवळून चेंडू चांगला भिरकावला होता. परंतु, तो पोस्टवरून गेला. ४२व्या मिनिटाला केरळा ब्लास्टर्सच्या बचावपटूंकडून आणखी एक अप्रतिम पाहायला मिळाला. हॉर्मिपाम मजबूत भिंत उभी करून एफसी गोवाला हतबल करताना दिसला. पण, ४५+१ मिनिटाला मिळालेल्या फ्री किकवर रोवलिन बोर्जेसने चेंडूला गोलजाळीची दिशा दाखवली आणि एफसी गोवाने १-० अशी आघाडी घेतली. पण, दुखापतीमुळे बोर्जेसला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले.
दुसऱ्या हाफमध्ये एफसी गोवाने वर्चस्व कायम राखणारा खेळ केला. केरळा ब्लास्टर्स बरोबरीचा गोल करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करताना दिसले. दिमित्रिओस डिएमांटाकोस सातत्याने गोल करण्याच्या संधी निर्माण करत होता. परंतु, त्याला अंतिम स्वरूप देण्यात केरळा ब्लास्टर्सला अपयश येत होते. ५८व्या मिनिटाला विबिन मोहनन गोल करण्याच्या जवळ पोहोचला होता. परंतु, त्याने टोलावलेला चेंडू पोस्टच्या वरून गेला. ५९व्या मिनिटाला मोहम्मद ऐमेनचा प्रयत्न रोखला गेला अन् क्वामे पेप्राहचा प्रयत्न थोडक्यात हुकला. पण, या सातत्याने होत असलेल्या प्रयत्नाने केरळा ब्लास्टर्सचे मनोबल उंचावत होते.
६९व्या मिनिटाला डिएमांटाकोसचा ऑन टार्गेट प्रयत्न एफसी गोवाच्या गोलरक्षकाने सहज रोखला. केरळा ब्लास्टर्सचा गोलरक्षक सचिन सुरेशने दुसऱ्या हाफमध्ये आणखी एक अप्रतिम बचाव केला. घड्याळाचे काटे पटपट पुढे सरकत असताना केरळा ब्लास्टर्सला बरोबरीचा गोल मिळत नव्हता. एफसी गोवाने त्यांचा बचाव भक्कम करताना संघात बदल केले आणि ते यशस्वी ठरताना दिसले. एफसी गोवाने १-० असा विजय निश्चित केला.

निकाल : एफसी गोवा (रोवलिन बोर्जेस ४५+१ मि.) विजयी वि. केरळा ब्लास्टर्स ०