टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाच्या हातून विजय हिसकावला

पाचव्या टी-२० सामन्यात कांगारूवर ६ धावांनी मात

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
03rd December 2023, 11:54 pm
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाच्या हातून विजय हिसकावला

बंगळुरु : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध रंगतदार झालेल्या पाचव्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियावर ६ धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १६१ धावांचे आव्हान दिले होते. ऑस्ट्रेलियाला मात्र २० षटकांमध्ये ८ विकेट्स गमावून १५४ धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियाला २०व्या षटकामध्ये विजयासाठी १० धावांची गरज होती. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेड मैदानात उभा होता. मात्र, अर्शदीपने हुशारीने गोलंदाजी केली. त्याने धोकादायक मॅथ्यू वेडला बाद केले आणि सामना भारताच्या बाजूने फिरवला. अर्शदीपने आपल्या आणि संघाच्या शेवटच्या षटकात १० धावांचा शानदार बचाव करत केवळ ३ धावाच दिल्या.

ऑस्ट्रेलियाकडून बेन मॅकडरमॉटने सर्वाधिक ५४ धावांची खेळी केली. ट्रेव्हिस हेडने २८ धावांचे योगदान दिले. टीम डेव्हिडने १७ आणि मॅथ्यू शॉर्टने १६ धावा जोडल्या. आरोन हार्डीने ६ तर जोश फिलीप ४ धावा करून माघारी परतला. बेन ड्वार्शुइस आला तसाच शून्यावर परत गेला. कर्णधार मॅथ्यू वेडने २२ धावा केल्या. तर नॅथन एलिसने ४ आणि जेसन बेहरेनड्रोफने २ धावा केल्या. टीम इंडियाकडून मुकेश कुमारने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर रवी बिश्नोई आणि अर्शदीप सिंह या दोघांनी प्रत्येकी २ फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर अक्षर पटेलने १ गडी बाद केला.

दरम्यान, त्याआधी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी भाग पाडले. टीम इंडियाने २० षटकांमध्ये ८ विकेट्स गमावून १६० धावा केल्या. टीम इंडियाडकडून यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड या सलामी जोडीने अनुक्रमे २१ आणि १० धावा केल्या. श्रेयस अय्यरने टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा केल्या. श्रेयसने ३७ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकांच्या मदतीने ५३ धावा केल्या. कर्णधार सूर्यकुमार यादव ५ आणि रिंकू सिंगने ६ धावा करून क्रिकेट चाहत्यांची निराशा केली. यष्टीरक्षक जितेश शर्माने २४ आणि अक्षर पटेलने ३१ धावा केल्या. तर रवी बिश्नोई आणि अर्शदीप सिंह या दोघांनी २-२ धावा जोडल्या.

संक्षिप्त धावफलक

भारत : २० षटकांत ८ बाद १६० धावा

ऑस्ट्रेलिया : २० षटकांत ८ बाद १५४ धावा

सामनावीर : अक्षर पटेल