यंदा ‘कर्तव्य’ उरकण्यासाठी आहेत सर्वाधिक मुहूर्त

तुळशी विवाहानंतर तब्बल ६३ दिवशी मुहूर्त

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
01st December 2023, 11:47 pm
यंदा ‘कर्तव्य’ उरकण्यासाठी आहेत सर्वाधिक मुहूर्त

पणजी : तुळशी विवाहानंतर राज्यात ‘लगीनघाई’ सुरू होते. त्यात एखाद्या वर्षी मुहूर्त कमी असतील, तर विवाहेच्छुक आणि त्यांच्या कुटुंबियांची तारांबळ उडते. मात्र या वर्षी हा ताण कमी होणार आहे. कारण विवाहासाठी तब्बल ६३ दिवसांचे मुहूर्त उपलब्ध आहेत.
यंदा २८ नोव्हेंबरपासूनच विवाहाचे मुहूर्त सुरू झाले आहेत. या ६३ पैकी दोन दिवसांचे मुहूर्त नोव्हेंबरच्या २८ व २९ तारखेला होऊन गेले. या दोन दिवसांत अनेकांनी लगीनगाठ बांधून घेतली. यापुढे ६ डिसेंबर ते पुढील वर्षाच्या १५ जुलैपर्यंत अनेक मुहूर्त आहेत. डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान सर्वाधिक मुहूर्त आहेत. गेल्या वर्षभरात विवाह मुहुर्ताचे ५५ दिवस होते. या मोसमात आठ दिवस जास्त आहेत. त्यामुळे लग्न ठरलेल्या वर आणि वधूच्या कुटुंबियांना विवाहाच्या नियोजनासाठी अधिक वेळ मिळणार आहे.
पुढच्या वर्षी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात मुहुर्ताचे १२ दिवस आहेत. गुरू ग्रहाचा अस्त ६ मे २०२४ ते २५ जून २०२४ दरम्यान असेल, तर शुक्र ग्रहाचा अस्त ८ मे ते १ जून २०२४ दरम्यान आहे. त्यामुळे मे आणि जून महिन्यात विवाह मुहूर्ताचे दिवस प्रत्येकी दोनच आहेत.

मुहूर्तांच्या वेळा स्थानानुसार
विवाह करण्यास अनुकूल दिवस ठरलेले असले, तरी प्रत्यक्षात एकाच दिवसांत अनेक मुहूर्त असतात. मात्र भौगोलिक स्थानानुसार मुहुर्तांची वेळ ठरत असल्यामुळे त्या वेळा स्थानिक पुरोहितांशी चर्चा करूनच ठरवाव्या लागतात.