गोवा कॅन्सर सोसायटीचे मत : शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास होणे आवश्यक
पणजी : राज्यात कर्करोगाचे रुग्ण वाढत आहेत हे खरे असेल तर या संबंधी शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास होणे आवश्यक आहे. यासाठीच आम्ही सरकारला विस्तृत अभ्यास करण्यासाठी प्रस्ताव देणार असल्याची माहिती गोवा कॅन्सर सोसायटीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांनी दिली.
गुरुवारी संस्थेच्या ३४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर धेंपो यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी डॉ. शेखर साळकर, डॉ. महेश नाईक, डॉ. सुरेश शेट्टी, डॉ. प्रमोद साळगावकर व इतर सदस्य उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या नवीन संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले.
डॉ. साळकर यांनी सांगितले की, राज्यात कर्करोगाचे वर्षाला सरासरी दीड हजार रुग्ण आढळतात. यातील सुमारे ३०० स्तनांचे, २०० तोंडाचा कर्करोग असे रुग्ण आढळतात. या रुग्णांचा आहार कोणता आहे? त्यांचे वजन जास्त आहे का? त्यांच्या गुणसुत्रांचा अभ्यास झाला आहे का? अशा विविध शास्त्रीय प्रश्नांची उत्तरे या अभ्यासातून मिळणे अपेक्षित आहे. ही उत्तरे मिळाल्यास कर्करोग वाढण्याचे कारण व त्यावर उपाय करता येऊ शकतील. राज्य सरकार, टाटा मेमोरियल गोवा कॅन्सर सोसायटीतर्फे संयुक्तरीत्या असा अभ्यास करता येईल. अशा स्वरूपाचा अभ्यास सलग २० वर्षे करावा लागेल. गोव्याची लोकसंख्या १५ लाख गृहीत धरल्यास १ लाख लोकांचे नमुने घेऊन असा अभ्यास करता येईल. २० वर्षांसाठी सुमारे २० कोटी रुपये निधीची गरज आहे. या अभ्यासातून रक्तदाब तसेच मधुमेहाचे रुग्ण ओळखणे देखील सोपे जाणार असल्याचे डॉक्टर साळकर यांनी सांगितले.
गोवा कॅन्सर सोसायटीतर्फे दरवर्षी कर्करोगाच्या विविध रुग्णांसाठी सुमारे ५० लाख रुपयांची मदत केली जाते. यामध्ये कमी दरात तपासणी, आर्थिक साहाय्य, व्याख्याने, रुग्णांसाठी फर्मागुडी येथे दिलासा केंद्र अशा विविध योजनांचा समावेश असल्याचे श्रीनिवास धेंपो यांनी सांगितले.
भविष्यात सरकारला अभ्यास उपयुक्त ठरेल!
असा एक समज आहे की, गोव्यात देशाच्या तुलनेत कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे. मात्र याबाबत सखोल अभ्यास करून ठोस पुरावा हाती आलेला नाही, असे श्रीनिवास धेंपो म्हणाले. बैठकीत या विषयी चर्चा करण्यात आली. हे खरे असेल तर गोव्यात कर्करोग वाढण्याचे कारण कोणते? यासाठी कोणत्या उपाय योजना करायला हव्यात? अशा प्रश्नांची उत्तरे या अभ्यासातून मिळतील. भविष्यात सरकारला देखील हा अभ्यास उपयुक्त ठरू शकतो, असे धेंपो पुढे म्हणाले.