साखळीत विद्यार्थ्याला मारहाण; शिक्षिका निर्दोष असल्याचा अहवाल

भाग शिक्षण अधिकाऱ्यांकडून प्राथमिक चौकशी पूर्ण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
01st December 2023, 12:38 am
साखळीत विद्यार्थ्याला मारहाण; शिक्षिका निर्दोष असल्याचा अहवाल

प्रतिनिधी। गोवन वार्ता      

पणजी : साखळीतील एका प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्याला झालेल्या कथित मारहाणप्रकरणी संबंधित शिक्षिका निर्दोष असल्याचा प्राथ​मिक अहवाल भाग शिक्षण अधिकाऱ्यांनी शिक्षण संचालनालयाला दिला. याबाबतची माहिती संचालक शैलेश झिंगडे यांनी दिली.      

संबंधित विद्यार्थ्याच्या पालकांनी पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस तपासात खरी परिस्थिती समोर येईल, असे त्यांनी सांगितले.      

विद्यार्थ्याच्या पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केलेली नाही. मात्र, शिक्षण संचालनालयाने विभागीय शिक्षणाधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले. संबंधित शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण केली नाही. तो भिंतीवर आदळल्याने तो जखमी झाल्याचे इतर शिक्षकांनी सांगितले. पालक शिक्षक संघटनेच्या सदस्यांनीही शिक्षकाची चूक नसल्याचे भाग शिक्षणाधिकाऱ्यांना सांगितले. त्याआधारे भाग शिक्षणाधिकाऱ्यांनी अहवाल सादर केल्याचे शिक्षण संचालकांनी सांगितले. या घटनेनंतर संबंधित शिक्षिकाने दुपारी विद्यार्थ्याच्या आईशीही चर्चा केली. आईने सायंकाळी डिचोली पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.      

शिक्षकांकडून विद्यार्थ्याला मारहाण झाल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. सप्टेंबरमध्ये एका शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर साखळी येथील एका प्राथमिक शाळेतील ही घटना २५ नोव्हेंबर रोजी घडली होती. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३२३ आणि बाल हक्क कायद्याच्या कलम ८(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आपण विद्यार्थ्याला मारले नसल्याचे शिक्षकाने पोलिसांना सांगितले.      

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांना भा.दं.सं.नुसार तपास करण्याचे अधिकार आहेत. मारहाणीची चौकशी करण्याचे किंवा कायद्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार शिक्षण विभागाला नाहीत. मात्र, शिक्षण विभागाने या घटनेची दखल घेत भाग शिक्षणाधिकाऱ्यांकडून अहवाल घेतला आहे. पोलीस तपास आणि कायद्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे शिक्षण संचालकांनी सांगितले.