भारताचा कॅनडावर मोठा विजय

महिला ज्युनियर हॉकी विश्वचषक; आज जर्मनीशी सामना

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
01st December 2023, 12:06 am
भारताचा कॅनडावर मोठा विजय

सँटियागो : भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाने बुधवारी रात्री सॅंटियागो, चिली येथे झालेल्या एफआयएच महिला हॉकी ज्युनियर विश्वचषक स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात कॅनडाचा १२-० असा पराभव करून स्पर्धेतील त्यांच्या मोहिमेची शानदार सुरुवात केली.
भारतासाठी मुमताज खानने चार गोल (२६वे, ४१वे, ५४वे आणि ६०वे), अन्नू (४वे, ६वे, ३९वे) आणि दीपिका सोरेंग (३४वे, ५०वे आणि ५४वे) प्रत्येकी तीन गोल केले. डिप्पी मोनिका टोप्पोने २१व्या मिनिटाला आणि नीलमने ४५व्या मिनिटाला गोल केले.
भारताने आक्रमक वृत्तीने सामन्याची सुरुवात केली, कॅनडावर सतत दबाव टाकला आणि झटपट आघाडी मिळवली. दरम्यान, लवकरच अन्नूने पेनल्टी कॉर्नरवरून दोन गोल करत आघाडी घेतली. दोन गोल करूनही भारताने आक्रमक खेळ सुरूच ठेवला आणि पहिल्या क्वार्टरपर्यंत आघाडी २.० अशीच राहिली. दुसऱ्या क्वार्टरमध्येही भारताचे वर्चस्व राहिले. याचा फायदा घेत डिप्पी आणि मुमताजने प्रत्येकी एक मैदानी गोल केला. दरम्यान, कॅनडाचा पेनल्टी कॉर्नर व्यर्थ गेला. मध्यंतरापर्यंत भारताकडे चार गोलची आघाडी होती.
उत्तरार्धात दीपिकाने पेनल्टी कॉर्नरमध्ये रूपांतर केले, त्यानंतर अन्नूने हॅट्ट्रिकही पूर्ण केली. मुमताजनेही तिचा दुसरा गोल केला. नीलमने पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर करत भारताची आघाडी ८.० पर्यंत वाढवली. शेवटच्या क्वार्टरमध्ये दीपिका आणि मुमताजने विजयी गोल केले. दरम्यान, शुक्रवारी १ डिसेंबर रोजी भारताचा स्पर्धेतील दुसरा सामना जर्मनीशी होणार आहे.