पाऊले चालती ओल्ड गोवाची वाट...

बेळगाव, दक्षिण महाराष्ट्रातील ख्रिस्ती यात्रेकरूंच्या पायी यात्रेला प्रारंभ

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
30th November 2023, 09:25 pm
पाऊले चालती ओल्ड गोवाची वाट...

बेळगाव : ओल्ड गोवा फेस्ताच्या पार्श्वभूमीवर बेळगाव आणि दक्षिण महाराष्ट्र भागातील ख्रिस्ती यात्रेकरूंनी ओल्ड गोवाच्या दिशेने पायी यात्रेला सुरुवात केली आहे. गडहिंग्लज, आजरा, कोल्हापूर, इचलकरंजी आणि आजूबाजूच्या यात्रेकरूंनी २९ नोव्हेंबरला पायी यात्रेला सुरुवात केली, तर बेळगाव आणि आजरा येथील यात्रेकरूंनी ३० नोव्हेंबरला सुरुवात केली. हे सर्व यात्रेकरू ३ डिसेंबरला ओल्ड गोवा येथे दर्शन घेणार आहेत.

रणरणत्या उन्हाला आणि अवकाळी पावसाच्या सरींचा सामना करत दक्षिण महाराष्ट्रातील काही यात्रेकरू चंदगड तालुक्यातील हेरे गावात पोहोचले आहेत. सेंट अँथनी चर्च, गडहिंग्लजचे पॅरिश प्रिस्ट फा. जो मोंतेरो दक्षिण महाराष्ट्रातील सुमारे २५० यात्रेकरूंच्या गटाचे नेतृत्व करत आहेत.

बेळगाव आणि खानापूर येथून निघालेल्या आणखी एका गटात इतर धर्माचे भाविक मोठ्या संख्येने आहेत. बेळगाव आणि खानापूर येथील यात्रेकरूंनी यात्रेला सुरुवात केली. सुमारे ७०० लोक रविवारी सकाळी ओल्ड गोवा येथे पोहोचतील.

गेल्या काही वर्षांत तीर्थक्षेत्र केवळ लोकप्रियच झाले नाही, तर ते आंतरधर्मीय सौहार्दाचे प्रतीकही बनले आहे. येथील गावातील लोक यात्रेकरूंना आंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था करण्याबरोबरच प्रेमाने अन्नही देतात. हे आंतरधार्मिय सौहार्दाचे प्रतीक बनला आहे, असे फा. मोंतेरो यांनी सांगितले.


हेही वाचा