‘फलोत्पादन’ला गणपती पावला; सात दिवसांत दोन कोटींची उलाढाल

६७४ टन भाजीची विक्री : स्थानिक शेतकऱ्यांचाही फायदा, गतवर्षीच्या तुलनेत १२५ टन अधिक विक्री

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
27th September 2023, 07:00 am
‘फलोत्पादन’ला गणपती पावला; सात दिवसांत दोन कोटींची उलाढाल

पणजी : गणेश चतुर्थीतील पहिल्या सात दिवसांच्या कालावधीत फलोत्पादन महामंडळाने सुमारे दोन कोटींची आर्थिक उलाढाल केलेली असून महामंडळाच्या स्टॉल्सवरून गतवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे १२५ टन अधिक भाजीची विक्री झालेली आहे. गेल्यावर्षी या सात दिवसांत ५५० टन भाजी विकली गेली होती. यंदा मात्र ६७४ टन भाजीची विक्री झालेली आहे.
महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक चंद्रहास देसाई यांनी ‘गोवन वार्ता’शी बोलताना याबाबतची माहिती दिली. गणेश चतुर्थी हा गोमंतकीय जनतेचा सर्वांत मोठा सण. दीड, पाच, सात, अकरा आणि एकवीस दिवस गणपती पूजण्याची प्रथा राज्यात आहे. या काळात भाज्यांना मोठी मागणी असते. फलोत्पादन महामंडळाच्या स्टॉल्सवर खुल्या बाजारापेक्षा कमी दराने भाजी मिळत असल्याने बहुतांशी गोमंतकीय तेथूनच भाजी खरेदी करण्यावर भर देत असतात. चतुर्थी काळात महामंडळ राज्यातील सुमारे १,२०० स्टॉल्सधारकांकडून प्रत्येक दिवसाची ऑर्डर घेऊन त्यांना भाजी पुरवत असते. यंदा पहिल्या सात दिवसांत महामंडळाच्या स्टॉल्सवरून ६७४ टन भाजीची विक्री झालेली असून, त्या माध्यमातून महामंडळाने सुमारे दोन कोटींची आर्थिक उलाढाल केलेली आहे, असे देसाई यांनी सांगितले.
गोव्याला भाजीचा पुरवठा प्रामुख्याने कर्नाटकातील बेळगावातून होत असतो. महामंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही ८० टक्के भाजीची आयात बेळगाव मार्केटमधून केली. तर, २० टक्के भाज्या स्थानिक शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आल्या. स्थानिक शेतकऱ्यांकडून गेल्या काही वर्षांपासून भेंडी, काकडी, दोडकी आणि दुधी भोपळा या भाज्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात असून, चतुर्थी काळात त्यांनी पुरवलेल्या या महत्त्वपूर्ण भाज्या गोमंतकीयांपर्यंत पोहोचवण्यात आल्या. या भाज्या बेळगावातून खरेदी केल्या नाहीत, असेही त्यांनी नमूद केले.

खुल्या बाजारातही कोट्यवधींची उलाढाल
चतुर्थी काळात खुल्या बाजारातही भाज्यांची कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. पणजीसह सर्वच बाजारांतील विक्रेत्यांनी बेळगाव, महाराष्ट्रातून भाजीची खरेदी केलेली होती. सुरुवातीचे काही दिवस भाज्यांचे दर वाढलेले होते. परंतु नंतर त्यात घट झाली, अशी माहिती पणजी बाजारातील विक्रेत्यांनी दिली.             

हेही वाचा