पर्यावरणपूरक चतुर्थी

एकूणच गणेश पूजन आणि इतर सणातही शक्य तेवढ्या चांगल्या पर्यावरणास पोषक गोष्टींचा वापर करणे यातच सर्वांचे हित आहे. यंदाचा गणेशोत्सवही प्रदूषणमुक्त करताना पूर्वीसारखाच सर्वांमध्ये आनंद वाटला जाईल याची सर्वांनी काळजी घ्यायला हवी.

Story: संपादकीय |
18th September 2023, 10:59 pm
पर्यावरणपूरक चतुर्थी

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पर्यावरणास हानिकारक आहेत, हे सिद्ध झाल्यामुळेच त्यांच्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळांनी देशभर बंदी आणली. शाडूच्या, चिकण मातीच्या मूर्तींना प्राधान्य दिले जाते, कारण विसर्जनानंतर पाण्यात त्या मूर्ती विरघळतात. हाताळण्यास हलक्या आणि सुंदर, रंगकाम तसेच मूर्तीही छान बनते, यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींमुळे देशभर पर्यावरणाचा प्रश्न ऐरणीवर आला. विशेष म्हणजे पर्यावरणाला हानिकारक ठरणाऱ्या या मूर्तींमुळे लोकांनीही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विकत घेणे टाळण्यास सुरुवात केली. तरीही काही प्रमाणात त्या मूर्ती बाजारात येतात. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे काही प्रमाणात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची विक्री होत असते. देशभर असे प्रकार सुरू आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींबाबत आता सर्वोच्च न्यायालयात विचार विमर्श सुरू झाला आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसला प्राधान्य दिले तर भविष्यात पर्यावरणाचा मोठा विद्ध्वंस होणार आहे, हे निश्चित. नद्या, तळ्यांचा समतोल बिघडून तिथे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होईल. जिथे गणपती विसर्जन होत असते अशी सर्व ठिकाणे पाणी प्रदूषणाची केंद्रे होतील. त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या दीर्घ काळासाठी लागणाऱ्या वस्तू सोडल्या तर विसर्जनासाठी वापरण्यात येणाऱ्या कुठल्याच मूर्ती यापासून बनवल्या जाऊ नयेत. 

तामिळनाडूतील मदुराई येथील एकसदस्यीय खंडपीठाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विकण्यास परवानगी दिल्यानंतर मद्रास उच्च न्यायालयाने रविवारी घेतलेल्या विशेष सुनावणीवेळी स्थगिती दिली. आता याचिकादार सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. मंगळवारी गणेश मूर्तींचे पूजन असल्यामुळे याचिकादाराने प्रकरण तातडीने सुनावणीस घेण्याची मागणी केल्यानंतर सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या न्यायपीठासमोर ही सुनावणी सुरू झाली. विशेष म्हणजे बहुतांश राज्यांतील प्रदूषण नियंत्रण मंडळांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घातली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अनेक राज्यांमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची विक्रीही घटली आहे. तरीही प्रशासनाची नजर चुकवून पाण्यात अनेक दिवस विरघळून न जाणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची विक्री होत असते. नियमांप्रमाणे त्या विकण्यास बंदी आहे. गोव्यासारख्या राज्यात जिथे दोन लाखांच्या आसपास गणेशमूर्तींची विक्री होते इथेही मोठ्या प्रमाणात पूर्वी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे फॅड आले होते. पण प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलीस, जिल्हा प्रशासनाने काही वर्षांपासून या मूर्तींवर बंदीसाठी कंबर कसली. त्यामुळे मागील काही वर्षांपासून शाडू मातीच्या किंवा चिकण मातीच्या मूर्तींच्या विक्रीवर भर दिला जातो. विशेष म्हणजे स्थानिक मूर्तिकारांना अनुदान देण्याची योजना सुरू केल्यामुळे चिकण मातीच्या मूर्ती मोठ्या प्रमाणात तयार होतात. मदुराईच्या खंडपीठाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे विसर्जन करता येत नाही पण त्या विकता येतात असा वेगळाच निर्णय दिला. गणेश मूर्तींचे विधिवत विसर्जन होते, खंडपीठाच्या निवाड्यामुळे गोंधळ आणखी वाढला. उच्च न्यायालयाने खंडपीठाच्या या निर्णयाला स्थगिती दिली, पण त्यानंतर हा वाद आता सर्वोच्च न्यायालयात आला. णाऱ्या मूर्तिकारांच्या कलेविषयी सर्वोच्च न्यायालयात याचिकादाराच्या वतीने ज्येष्ठ वकील श्याम दिवाण यांनी बाजू मांडली, पण विसर्जनाच्या विषयामुळेच या मूर्तींवर प्रदूषण नियंत्रण मंडळ बंदी घालत असते, हा विषयच गांभीर्याने घेतला गेला नाही असेच दिसून येते.

मुळात प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर अनेक कामांमध्ये होतो. ऑर्थोपेडिक उपचार ते बांधकाम क्षेत्रातील वापर यामुळे त्याला मागणी असते. काहींच्या मते त्याचा पुनर्वापर शक्य आहे तर काहींच्या मते शाडूही पर्यावरणास योग्य आहे याचे निकष कोणी निश्चित केलेले नाहीत. त्यामुळे चिकण माती हा सर्वात चांगला पर्याय ठरतो. गणेश मूर्तींसाठी वापरण्यात येणारे रंगही पर्यावरणासाठी घातक असतात त्यामुळे सेंद्रीय रंगांचा वापरही सक्तीने व्हायला हवा. गेल्या काही वर्षांत झपाट्याने हवामान बदल होत असल्यामुळे त्याचे परिणामही दिसू लागल्यामुळे फटाक्यांसारख्या गोष्टींवरही लोकांनी स्वतःच निर्बंध घातलेले आहेत. मोठ्या प्रमाणात फटाके लावले जात नाहीत. एकूणच गणेश पूजन आणि इतर सणातही शक्य तेवढ्या चांगल्या पर्यावरणास पोषक गोष्टींचा वापर करणे यातच सर्वांचे हित आहे. यंदाचा गणेशोत्सवही प्रदूषणमुक्त करताना पूर्वीसारखाच सर्वांमध्ये आनंद वाटला जाईल याची सर्वांनी काळजी घ्यायला हवी. विघ्नहर्ता सर्वांचा आनंद द्विगुणीत करो तसेच सर्वांना सुख, समृद्धी व निरोगी आरोग्य देवो.