संस्कार स्वाभिमानाने जपा

Story: अध्यात्म |
28th May, 11:39 pm
संस्कार स्वाभिमानाने जपा

आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आपला रस वाढावा यासाठी त्यावर चर्चा होणे गरजेचे आहे. आध्यात्मिक क्षेत्रात चर्चा वाढल्याने मनाला शांती लाभेल. ईश्वराबद्दलचे विचार आपल्या रक्तात पोहचतील. ईश्वराबद्दलची महिती समाजामध्ये वाढीस लागेल. अध्यात्मिकता माणसाला शांती देणारी गोष्ट आहे. अध्यात्मिकता आपल्या आचरणातून दाखवण्याची आवश्यकता आहे. वर्षभरातून कुठलातरी एक ग्रंथ आपण आपल्या घरी वाचावा, दिवसातून किमान १०८ वेळा घरातल्या सगळ्या सदस्यांनी देवघरात बसून मंत्र जप करावा. संतसमागम, गुरुपूजन हे आपल्या घरामध्ये आध्यात्मिक चर्चेचे माध्यम आहे. एका कुठल्या संकटावर परत परत विचार करत गेला तर तुमचा दिवस कसा संपेल कळणार पण नाही, या सर्व स्वार्थाने प्रेरित अशा गोष्टी आहेत त्या माणसांना त्रास करतात. मग आम्हाला समाधान पाहिजे असेल तर स्वार्थ सोडून परमार्थ साधला पाहिजे म्हणून देवाची चर्चा होणे, देवाविषयी प्रीती मनुष्याला आवश्यक आहे. जे तुमच्या हातातच नाही ते भगवंत सहज लिलया करू शकतो. ही ताकद या अध्यात्माची म्हणून सगळ्यांनी भगवंतावर विश्वास वाढवला पाहिजे आणि विश्वास वाढवायचा असेल तर घराघरांमध्ये अाध्यात्मिक चर्चा होणे महत्त्वाचे आहे. देशामध्ये साधुसंत मोठ्या प्रमाणात आहेत, गावागावांमध्येही देवळे आहेत, मठ-आश्रम आहेत पण या सगळ्याची किंमत ज्या पद्धतीने आपल्या जीवनामध्ये ठेवायला पाहिजे ती आज कमी होताना दिसते आहे. आमची पुढची पिढी अध्यात्माला कमी लेखते आहे. तुम्ही डोक्यावर शेंडी ठेवा, तुम्ही धोतर नेसा आणि समाजामध्ये चला तुम्हाला कमी लेखले जाणार. जो धोतर नेसलेला आहे, डोक्यावर शेंडी ठेवलेली आहे त्याला स्वत:ला स्वाभिमान वाटला पाहिजे. समोरच्याला वाटो अथवा न वाटो. तेव्हा कुठे तरी या समाजामध्ये रूप तुमचे उभे राहणार आहे. आपल्याच देवादिकांबद्दल आपल्याला स्वाभिमान नसेल तर समोरच्या माणसाला कसा काय स्वाभिमान तयार होणार. म्हणूून तो स्वाभिमान धार्मिक ग्रंथ तयार करीत असतात. आम्ही आमच्या जाणत्या लोकांना विचारले की तुम्ही एवढ्या लहान वयामध्ये सद्गुरू चरणी लीन झालात. त्यावेळी त्यांनी उत्तर दिले की आमच्या गावात ग्रंथ वाचन होत होते, अध्यात्म्याच्या चर्चा होत होत्या, मंदिरामध्ये पारायणे होत होती, त्यामुळे आम्हाला समजले सद्गुरू वाचोनी सापडेना सोय। सद्गुरूंशिवाय तरणोपाय नाही. श्रीगुरूंना शरण गेलेच पाहिजे. म्हणजे ती चर्चा घरी होत होती. मुलांमध्ये, आईवडिलांमध्ये ही चर्चा रुजवली पाहिजे म्हणून आपली जेवढी म्हणून अाध्यात्मिक लोकं आहेत त्या सर्वांनी आपल्या घरामध्ये धार्मिक संस्कार, अध्यात्मिकता आपल्या घरामध्ये सुरू करा.

(शब्दांकन - वेदमूर्ती व्रजेश गुरव, तपोभूमी-गोवा)