लग्नास नकार देऊन केली अत्याचाराची तक्रार; न्यायालयात तरुण ठरला निर्दोष

तरुणाला कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचा डाव फसला

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
27th May 2023, 12:15 am
लग्नास नकार देऊन केली अत्याचाराची तक्रार; न्यायालयात तरुण ठरला निर्दोष

पणजी : वधूवर सूचक संकेतस्थळावरून घटस्फटितांचे प्रेम जुळले. यातून शारीरिक संबंधही प्रस्थापित केले. याच प्रेमात लाख रुपयांची देवघेवही झाली. यातून त्यांच्यात बिनसले. त्यामुळे महिलेने लग्नास नकार दिला. शेवटी संशयिताने दुसऱ्या महिलेशी लग्न केले. या प्रकाराने संतापलेल्या पहिल्या महिलेने पोलिसांत, लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार संशयिताच्या विरोधात दिली. पण न्यायालयात तिची डाळ शिजली नाही. सत्य समोर आले आणि संशयिताला न्यायालयाने निर्दोष मुक्त केले.
हा निवाडा उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने जारी केला आहे. मूळ तक्रारीनुसार, घटस्फोटित महिलेने दुसऱ्या लग्नासाठी एका वधू-वर सूचक संकेतस्थळावर नोंदणी केली होती. याच संकेतस्थळावर ३७ वर्षीय घटस्फोटित तरुणाने विवाहासाठी नोंदणी केली होती. याच संकेतस्थळावर दोघांची ओळख झाली. संशयिताने १८ जून २०१३ रोजी महिलेशी प्रथम संपर्क साधला. त्यानंतर ओळखीचे मैत्री रूपांतर झाले. २६ जानेवारी २०१४ रोजी प्रथमच त्या दोघांची प्रत्यक्ष भेट झाली. त्यानंतर त्या दोघांचा साखरपुडा झाला. याच, दरम्यान ८ एप्रिल २०१५ आणि ९ एप्रिल २०१४ रोजी जुने गोवा पोलीस स्थानकाच्या हद्दीत संशयितांच्या घरी दोघेही भेटले. तिथेच त्यांच्या शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. नंतर दोघांनी साखरपुडा केला. कालांतराने त्यांच्यात बिनसले आणि अचानक त्या महिलेने जुने गोवे पोलीस स्थानकात १९ जानेवारी २०१६ रोजी तक्रार दाखल केली. संशयिताने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले आणि १ लाख रुपये घेतले, असे तिने तक्रारीत नमूद केले. याची दखल घेऊन जुने गोवा पोलिसांनी संशयिताच्या विरोधात भा.दं.सं.च्या कलम ३७६ आणि ४२० अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी २१ जानेवारी २०१६ रोजी संशयिताला अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने ३० जानेवारी २०१६ रोजी सशर्त जामीन मंजूर केला होता. पोलिसांनी तपास पूर्ण केल्यानंतर २८ जुलै २०१६ रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. हे प्रकरण उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आले होते. या प्रकरणी न्यायालयात सुनावणीवेळी दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाले. यात महिलेचा बनाव उघड झाला. न्यायालयाने संशयितांची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली.

का सुटला संशयित निर्दोष...

- महिला गोव्याबाहेरील आहे. त्यामुळे साखरपुडा झाल्यानंतर तरुणाने लग्नाची नोंदणी करण्यासाठी तिच्या वाढदिनीच तिला गोव्यात बोलावले होते. त्यानुसार ८ एप्रिल २०१५ रोजी महिला गोव्यात आली होती.
- ८ एप्रिल २०१५ रोजी संशयिताने तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवल्याचा महिलेने केला होता. मात्र, शरीरसंबंध ठेवल्यानंतर दोघेही कॅसिनोत गेले आणि तिथे महिलेचा वाढदिवस साजरा केल्याची माहिती सुनावणीवेळी समोर आली.
- आदल्या दिवशी बळजबरी अत्याचार झाला असतानाही ९ एप्रिल २०१५ रोजी महिला संशयितासोबत राहिली. त्या दिवशीही लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप तिने केला होता. पण, उलटतपासणीच्या वेळी हा आरोप सिद्ध करण्यात ती अपयशी ठरली.
- वरील घटना घडल्यानंतर महिलेने संशयितास नकार दिला. त्यामुळे संशयिताने दुसरे लग्न केले. त्यानंतर महिलेने संशयिताच्या विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीत १ लाखाची फसवणूक केल्याचा आरोपही महिलेने केला होता. तोही सिद्ध करण्यात ती अपयशी ठरली.

हेही वाचा