बनावट मुंडकाराद्वारे जमीन हडप

रेईश-मागूसमधील मूळ मालकाकडून मामलेदार कार्यालयात तक्रार


27th May 2023, 12:51 am
बनावट मुंडकाराद्वारे जमीन हडप

प्रतिनिधी। गोवन वार्ता            

म्हापसा : मुंडकार असल्याची बनावट कागदपत्रे सादर करून रेईश-मागूस येथील १२०० चौ. मी. जमीन हडप करण्याचा नवा प्रकार उघडकीस आला आहे. सदर अतिक्रमणाविरुद्ध कारवाई करून त्याला जमिनीतून हटवावे, अशी मागणी कॅनडास्थित रोनाल्ड फर्नांडिस यांनी बार्देश मामलेदार कार्यालयाकडे तक्रारीद्वारे केली आहे.            

तक्रारदार रोनाल्ड थॉमस फर्नांडिस हे कॅनडामधून सुट्टीवर गोव्यात आले होते. तेव्हा त्यांच्या रेईश मागूस येथील सर्व्हे क्रमांक २१/१ मधील जमिनीत पक्के बांधकामाचे अतिक्रमण सुरू असल्याचे आढळून आले. त्यांनी पंचायत व मामलेदार कार्यालयाकडून जमिनीची कागदपत्रे मिळवली, तेव्हा सदर जमिनीत पार्वती महादेव चोर्लेकर नामक व्यक्तीने मुंडकार खटल्याच्या आधारे ही जमीन मिळवल्याचे स्पष्ट झाले. मुंडकार खटल्याचा हा निवाडा १९९७ मध्ये मामलेदार कार्यालयातून निकाली काढला होता. यावेळी संबंधितांनी बनावट कागदपत्रे सादर करून, तसेच बोगस व्यक्ती मामलेदार कार्यालयात हजर करून हा खटला आपल्या बाजूने मिळवून घेतला, असा दावा फर्नांडिस यांनी केला आहे.             

याबाबत फर्नांडिस यांनी मामलेदार कार्यालयाकडे जमिनीच्या कागदपत्रांसह तक्रार सादर केली आहे. या अतिक्रमण केलेल्या बोगस मुंडकारावर कारवाई करून त्याला आपल्या जमिनीतून बाहेर काढावे, अशी मागणी त्यांनी मामलेदारांकडे केली आहे. त्यांनी पर्वरी पोलिसांतही तक्रार दाखल करत सदर अतिक्रमणावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यावेळी फर्नांडिस यांच्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते संजय बर्डे, अॅड. अतुल नाईक, सचिन किटलेकर, सीतेश मोरे उपस्थित होते.

संजय बर्डे म्हणाले, १९९७ साली निकाली काढलेल्या मुंडकार खटल्याची चौकशी करावी व फर्नांडिस यांना जमीन परत करावी. तपासणी न करता चुकीच्या कागदपत्रांद्वारे निवाडा दिलेल्या तत्कालीन मामलेदारांवर सरकारने कारवाई करावी. आपले अनेक गोमंतकीय बंधू नोकरीसाठी परदेशी गेले आहेत. त्यांच्या मालकीच्या जमिनी अशा बनावट मुंडकारांमार्फत हडप केल्या जात असतील तर ही गंभीर बाब आहे. सरकारने या प्रकरणी ताबोडतोब कारवाई करावी.

राज्यात बनावट कागदपत्रांद्वारे जमीन हडप करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहेत. अशा प्रकारचे बेकायदेशीर प्रकार रोखण्यासाठी आणि अशा प्रकारांत गुंतलेल्यांना गजाआड करण्यासाठी सरकारने विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या पथकाद्वारे विविध प्रकरणे हाताळली जात आहेत. अनेक प्रकरणांत संशयितांना तुरुंगवासही भोगावा लागला आहे. अनेक जणांचे खटले न्यायालयात सुरू आहेत. तरीदेखील अशी नवी प्रकरणे उघडकीस येत आहेत.

संशयिताचा एकापेक्षा अधिक जागांवर कब्जा

गोवा कुळ मुंडकार कायद्याअंतर्गत एखाद्या कुळाला एकूण जमिनीपैकी ३०० चौरस मीटर जमीन देण्याचा नियम आहे. पण २४ जुलै १९९७ मध्ये मामलेदारांकडून हा कुळ मुंडकार खटला निकाली काढताना एकूण जमिनीपैकी किती जमीन अर्जदाराला दिल्याचे नमूद केलेले नाही. त्यामुळे सर्वच्या सर्व १२०० चौ. मी. जमिनीवर संबंधिताने कब्जा केला आहे. शिवाय कुळ मुंडकार कायद्यानुसार एखादा मुंडकार एकाच जमिनीचा हक्कदार असतो. वरील व्यक्तीने एकापेक्षा जास्त जागांवर आपला मुंडकार म्हणून हक्क दाखवला आहे.