धोनी मॅजिक; चेन्नई अंतिम फेरीत

गुजरात टायटन्सचा १५ धावांनी पराभव : ऋतुराजची शानदार खेळी


23rd May 2023, 11:50 pm
धोनी मॅजिक; चेन्नई अंतिम फेरीत

न्यूज डेस्क। गोवन वार्ता

चेन्नई : महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज, जे गेल्या वर्षी लीग स्टेजमधून लाजिरवाण्यापद्धतीने बाहेर पडले होते, ते आयपीएल २०२३ च्या अंतिम फेरीत पोहोचले आहेत. क्वालिफायरमध्ये त्यांनी गुजरात टायटन्सचा पराभव केला.

पुनरागमन करण्यात धोनी किती पटाईत आहे हे पुन्हा एकदा त्याने दाखवून दिले. गेल्या मोसमात ते तळातून दुसऱ्या क्रमांकावर होते, पण ती गेल्या वर्षीची गोष्ट होती आणि ही यंदाची गोष्ट आहे. गेल्या हंगामातील चॅम्पियन गुजरात टायटन्सचा पहिल्या क्वालिफायरमध्ये चेन्नईने १५ धावांनी पराभव केला होता.

यासह चेन्नईने १०व्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. इतकेच नाही तर चेन्नईने हार्दिक पांड्याच्या गुजरातलाही आयपीएलमध्ये प्रथमच पराभूत केले आहे. चेन्नईने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर राहून प्लेऑफसाठी पात्रता मिळवली होती, तर पांड्याच्या गुजरातने अव्वल स्थानावर राहून प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता, मात्र पात्रता फेरीत धोनीचे वर्चस्व होते.

चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील पहिला क्वालिफायर चेपॉक येथे खेळवला गेला. चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्ससमोर विजयासाठी १७३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने २० षटकांत ७ गडी गमावून १७२ धावा केल्या.

तत्पूर्वी, गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. नाणेफेक हारल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी करताना दमदार सुरुवात केली. चेन्नई सुपर किंग्जचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि ड्वेन कॉनवे यांनी पहिल्या विकेटसाठी १०.३ षटकांत ८७ धावा जोडल्या, पण शिवम दुबे आणि अजिंक्य रहाणे या आघाडीच्या फलंदाजांनी दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर निराशा केली. मात्र, शेवटच्या षटकात रवींद्र जडेजाने १६ चेंडूत २२ धावा काढून चांगली साथ दिली. ऋतुराज गायकवाडने ४४ चेंडूत ६० धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ७ चौकार आणि १ षटकार मारला. तर ड्वेन कॉनवेने ३४ चेंडूत ४० धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत ४ चौकार मारले.