कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळला अंतरिम जामीन
न्यूज डेस्क । गोवन वार्ता
बंगळुरू : कर्नाटक उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन अर्ज फेटाळल्यानंतर भाजपचे आमदार मदल विरुपक्षप्पा यांना लाच प्रकरणात अटक करण्यात आली. भाजप आमदाराला सोमवारी तुमकुरू येथील टोल प्लाझाजवळून अटक करण्यात आली.
भाजप आमदार मदल विरुपक्षप्पा यांचा मुलगा प्रशांत मदल याला लोकायुक्त अधिकाऱ्यांनी २ मार्च रोजी एका कंत्राटदाराकडून ४० लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले होते. ही रक्कम तो वडिलांच्या वतीने केएसडीएल कार्यालयात घेत असल्याचा आरोप आहे. कर्नाटक सोप्स अँड डिटर्जंट्स लिमिटेडला कच्चा माल पुरवण्यासाठी ही लाच देण्यात आली होती.
प्रशांत मदल हा बंगळुरू पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण मंडळाचा मुख्य लेखा अधिकारी आहे. मुलाच्या अटकेनंतर विरुपक्षप्पा यांनी केएसडीएल अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. हा कथित घोटाळा केएसडीएलमधील रसायनांच्या पुरवठ्याशी संबंधित आहे, ज्यामध्ये ८१ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. विरुपक्षप्पाच्या घरातून ८ कोटींहून अधिकची बेहिशेबी रोकडही जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आणखी चार जणांना अटक केली आहे.