कॅसिनो व्यावसायिकाकडून लाच मागितल्याप्रकरणी चौकशी

प्राथमिक चौकशीअंती अहवाल देण्याचा डीजीपींना आदेश

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
28th March 2023, 12:16 Hrs
कॅसिनो व्यावसायिकाकडून लाच मागितल्याप्रकरणी चौकशी

पणजी : दहशतवाद विरोधी पथकातील कर्मचाऱ्यांनी (एटीएस) कॅसिनो व्यवसायाशी संबंधित व्यापाऱ्याकडून लाच मागितल्याप्रकरणी वृत्तपत्रांतील बातमीची दखल घेऊन पोलीस महासंचालकांना (डीजीपी) प्राथमिक चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश दक्षता खात्याने दिल्याची माहिती मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत लेखी उत्तरात दिली आहे.                               

या प्रकरणी हळदोणाचे आमदार कार्लुस फेरेरा  यांनी विधानसभेत अतारांकित लेखी प्रश्न दाखल केला होता.             

दि. १७ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता गोवा पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) सहा कर्मचारी पणजीतील एका कॅसिनो व्यवसायाशी संबंधित व्यापाऱ्याकडे गेले होते. तेथे त्यांनी व्यापाऱ्याला धमकी देत त्याच्याकडून लाचेची मागणी केली होती. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची  बातमी वृत्तपत्रांत प्रसारित झाली होती. याबाबत दक्षता खात्याकडे कोणतीच तक्रार आली नाही. मात्र वृत्तपत्रांवर आलेल्या बातमीची दखल घेऊन पोलीस महासंचालकांना प्राथमिक चौकशी करून अहवाल सादर करण्याची सूचना केल्याची माहिती लेखी उत्तरात देण्यात आली आहे.