आला वसंत, बहरला आसमंत

Story: ललित | शुभदा मराठे |
25th March 2023, 12:01 am

आपल्या भारतीय संस्कृतीत आपण सदैव महिलांना, मुलींना तसेच कुटुंबातील प्रत्येकाला काही ना काही महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. आत्ताच पाहा ना चैत्र प्रतिपदेला घरातील कर्ता पुरूष  गुढीची पूजा करतो आणि महिला गुडीला हळद-कुंकू वाहून तिची आरती करतात.

पाडव्याच्या दिवशी नववधूला 'पासडी ' म्हणजेच नवीन साडी नेसवली जाते. यावेळी माहेराहूनही मुलीला साडी एखादा दागिना आहेर केला जातो जावयाचाही यथोचित मान राखला जातो.

तृतीयेला गौर ठेवली जाते देवी पार्वती चैत्र शुद्ध तृतीयेला माहेरपणाला येते. म्हणून घरोघरी चैत्र गौरीचे पूजन केले जाते. भल्या सकाळी अंगण सारवून त्यावर सुंदर रांगोळी घातली जाते  तिला 'चैत्रांगण' असे म्हणतात. चैत्रांगणात रांगोळीने मंदिरात विठ्ठल रुक्माई समई, शंख, चक्र, गदा, गोपद्म, त्रिशूल, हत्ती, सूर्य, चंद्र, स्वस्तिक आदी अनेक चित्रे रांगोळीने रेखाटली जातात. त्यावर हळद कुंकू फुले वाहून पूजा केली जाते.

देवघरात लाकडी झोपाळा म्हणजेच दोल्लारा चौरंगावर ठेवतात व देवी अन्नपूर्णेची मूर्ती विधीवत पूजा करून दोल्लाऱ्यात बसवितात पक्कवानांचा नैवेद्य  दाखवतात.

वसंत ऋतूत  फळा फुलांना बहर आलेला असतो अशावेळी या ऋतूत मिळणारी  रसदार फळे सुगंधी फुले या सगळ्याचा वापर करून खूप छान हळदी कुंकू केले जाते या हळदी कुंकवाची मजाच न्यारी असते माझ्या लहानपणी तर ही एक खास पर्वणी असायची.

हळदी कुंकवाच्या दिवशी गावातल्या सर्व बायका मुलींना आमंत्रण दिले जाई. अंगणात सुंदर रांगोळ्या घालत. दुपारी गौरीची पूजा झाल्यावर तिला सुंदर नवी कोरी साडी नेसवली जाई. सौभाग्यलंकारांनी गौरीला अलंकृत केले जाई. त्याचबरोबर या ऋतूतील सुगंधित फुलांच्या म्हणजे देवचाफा मोगरा अबोलीच्या फुलांच्या माळांनी देवीला सजवित. भुईचाफा हे जांभळ्या दुधाळ रंगाचे विशेष सुवासिक फूल खास देवीला वाहतात. हे फूल याच ऋतुत फुलते. याचे वैशिष्ट्य म्हणजे ते जमिनीतून सरळ उगवते. 

हळदी कुंकवाला बायका आल्यावर बसायला आसन दिले जाई. ताम्हणात पाय ठेवून धुतले जात व नंतर हळद कुंकू लावले जाई. या हळदी कुंकवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे कैरी किसून केलेली डाळीची कोशिंबीर तिला हिंंग जिऱ्याची दिलेली खमंग फोडणी( नाव घेताच तोंडाला पाणी सुटते) आणि कैरीचे पन्हे. या ऋतूत मिळणारी सर्व प्रकारची फळे आंबा, गरे, काजू, जांभळे, करवंदे, पेरु, चुरणे, कलिंगड, केळी चांदीवड्याच्या गोल टोकदार पानावर घालून असे प्रत्येक पान सवाष्णीला वाण दिले जाई. व ओल्या वाटाण्यानी तिची ओटी भरीत.

यावेळी खास करून जाणत्या बायका चैत्र गौरीची गाणी म्हणत त्यात चैत्रगौर, जांभूळ अशा प्रकारची दीर्घ काव्य गायली जात या गाण्यातून सुद्धा वसंत ऋतुच्या आगमनान निसर्गातील नवलाईचे वर्णन ओतप्रोत भरलेले असे. सर्व बायका मोठ्या प्रेमाने आपुलकीने आणि उत्साहाने  सगळ्याजणी मिळून हा सण साजरा करीत व अजूनही करतात.

शिवाय रामनवमीच्या दिवशी गावातील प्रत्येक देवळात राम जन्मानंतर हळदी कुंकवाचा सोहळा संपन्न होतो आम्ही आर्या भगिनीं एकत्र येऊन विठ्ठल रुक्माईच्या देवळात खास हळदीकुंकू कार्यक्रम साजरा करतो. चैत्र महिन्यात अजूनही हनुमान जयंती येते किंवा अष्टमीला कन्या पूजन असे कार्यक्रम साजरे केले जातात या सर्व कार्यक्रमात बायकांना प्राधान्य तर दिले जाईच. अजूनही दिले जाते. काळाच्या ओघात शेण मातीच्या जमिनी जाऊन त्या जागी सिमेंटच्या जमिनी आल्या, नऊवारी साड्यांची जागा पाचवारी आणि चुडीदारने  घेतली तरीही संस्कार पावित्र्य आणि मांगल्य तसेच आहे. अजूनही हळदी कुंकू किंवा इतर धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी सगळ्या जणी नऊवारी साडी नेसून हौसेने नाकात नथही घालतात.

कुटुंबातील सर्व घटकांना त्यांच्या वयोमानाप्रमाणे अधिकार व समानता देण्याची रीत भारतीय संस्कृतीत आहे सण उत्सव वेळेच्या वेळी साजरी केले जातात यातून परस्परांतील संपर्क, आपुलकी, प्रेम मदतीची भावना यासारख्या कितीतरी गुणांचे संवर्धन  होत राहते. या आणि अशा अनेक माध्यमातून आपल्या भारतीय संस्कृतीची वाटचाल अविरतपणे चालू आहे आणि ते तशी चालू राहील त्यासाठी वर्षातून एक दिवस महिला दिन साजरा करून महिला किती आगतिक आहेत किंवा पुरुष कसे निष्ठूूर असतात (याला अपवाद आहेत,पण) वगैरे दाखवून द्यायची फारशी गरज नाही कारण आपली भारतीय संस्कृती इतकी व्यापक आणि सर्वसमावेशक आहे त्याचा नीट आणि सखोल अभ्यास करून ती समजून घेतली तर आपल्याला खरे काय आहे ते कळेल आणि पटेलही. नदीच्या स्वच्छ आणि निर्मळ प्रवाहासारखी अखंड वाहत जाणारी आणि  वृद्धिंगत होणारी आपली संस्कृती आहे. त्याग संस्कार सामाजिकता आणि समाधानाच्या भक्कम पायावर ती उभी आहे कितीही संकटे आली तरी ती लिलया झेलून त्यातून सहीसलामत बाहेर पडून स्वतःचे अस्तित्व सिद्ध करणारी आपली संस्कृती आपल्या नेहमीच्या आचार विचार आणि संस्कारातून वसंत ऋतुसारखी प्रफुल्लीत होत राहते, राहील.