काँग्रेस समविचारी पक्षांना सोबत घेऊन लोकसभा निवडणूक लढवणार!

गोवा प्रभारी मणिकम टागोर यांची माहिती, तरुण नेत्यांनाही उमेदवारी देण्याचे निश्चित

|
19th March 2023, 12:29 Hrs
काँग्रेस समविचारी पक्षांना सोबत घेऊन लोकसभा निवडणूक लढवणार!

पत्रकार परिषदेत बोलताना मणिकम टागोर, सोबत प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, खासदार फ्रान्सिस सार्दिन, आमदार आल्टन डिकॉस्ता व अॅड. कार्लुस फेरेरा.


प्रतिनिधी। गोवन वार्ता

पणजी : आगामी लोकसभा निवडणूक काँग्रेस समविचारी पक्षांना सोबत घेऊन लढणार आहे. शिवाय ज्येष्ठांसोबतच तरुणांनाही उमेदवारी देण्यात येणार असल्याचे काँग्रेसचे गोवा प्रभारी मणिकम टागोर यांनी शनिवारी जाहीर केले.

पणजीतील काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, खासदार फ्रान्सिस सार्दिन, आमदार एल्टन डिकॉस्ता, अॅड. कार्लुस फेरेरा आदी यावेळी उपस्थित होते.

केंद्रातील भाजप सरकारने लोकशाहीची हत्या करण्याचे काम वारंवार सुरूच ठेवले आहे. भाजप सरकारात सहभागी असलेल्या पक्षांतील नेत्यांनाच संसदेत बोलू दिले जात आहे. काँग्रेससह इतर सर्व विरोधी पक्षांचा आवाज त्यांच्याकडून दाबला जात आहे. याचा बदला देशातील जनता येत्या लोकसभा निवडणुकीत निश्चित घेईल, असे टागोर म्हणाले. लोकसभा निवडणुकीत ५० वर्षांवरील आणि ५० वर्षांखालील ५०-५० टक्के नेत्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय अखिल भारतीय काँग्रेसने घेतलेला आहे, असे ते म्हणाले.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत यावेळी उमेदवार लवकर घोषित होणार का? असा प्रश्न पत्रकारांनी केला असता, उमेदवारीसंदर्भात काँग्रेस व्यापक समिती नियुक्त करणार आहे. ही समिती प्रत्येक राज्याचा अभ्यास करून उमेदवार निश्चित करेल. आणि त्यानंतर उमेदवारांची​ घोषणा केली जाईल, असेही टागोर यांनी नमूद केले.

सूचना मोहिमेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद : पाटकर

प्रदेश काँग्रेसच्या ‘हात से हात जोडो’ मोहिमेला गोव्यातील प्रत्येक भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यासोबत सूचना देण्यासाठी जारी केलेल्या ई-मेल आणि मोबाईलवरूनही अनेक नागरिक व कार्यकर्त्यांकडून सूचना दिल्या जात आहेत. या सर्व सूचनांचा गांभीर्याने विचार करून त्यानुसार पक्षात बदल केले जातील, असे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले. राज्यातील भाजप सरकार विविध घोषणा आणि आश्वासने देऊन गोमंतकीय जनतेची फसवणूक करीत आहे. परंतु, ग्रामीण भागातील वस्तुस्थिती पूर्ण वेगळी आहे, असेही पाटकर म्हणाले.