पुढील एक आठवडा ‘अटलसेतू’ वाहतुकीसाठी राहणार बंद

उत्तर गोवा जिल्हाधिकारी मामू हागे यांच्याकडून आदेश जारी


18th March 2023, 11:35 pm
पुढील एक आठवडा ‘अटलसेतू’  वाहतुकीसाठी राहणार बंद

प्रतिनिधी । गोवन वार्ता       

पणजी : ‘अटल सेतू’वरील रस्ता सपाटीकरण व इतर कामांसाठी पुढील एक आठवडा पूल वाहतुकीसाठी पूर्णवेळ बंद ठेवण्यात येणार आहे. उत्तर गोवा जिल्हाधिकारी मामू हागे यांनी या संदर्भातील आदेश जारी केला आहे.       

या काळात पुलाच्या बाजूच्या समांतर रस्त्यांवरून वाहतूक सुरू राहील. केवळ काम सुरू असतानाच पूल बंद राहील. अत्यंत महत्त्वाच्या कारणासाठी पूल खुला करावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे. रात्रीच्या वेळी नागरिकांना पूल बंद असल्याच्या सूचना दिसाव्यात यासाठी ठळक व उठावदार रंग वापरावेत, अशी सूचनाही त्यांनी केली आहे. काम पूर्ण झाल्यावर तत्काळ या सूचना काढून टाकाव्यात. गोवा राज्य पायाभूत विकास महामंडळ हे काम करत आहे. त्यांनी वाहनचालकांना मार्गदर्शन करण्यासाठी वाहतूक मार्शल ठेवावेत. पणजी व पर्वरी पोलिसांना याबाबत माहिती द्यावी, असेही  आदेशात म्हटले आहे.

अधिवेशनामुळे २७ मार्चपूर्वी पूल खुला करा !

सोमवार, दि. २७ मार्च रोजी विधानसभा अधिवेशन सुरू होणार आहे. या काळात वाहतुकीसाठी अडथळा येऊ नये यासाठी दि. २६ मार्चच्या रात्रीपर्यंत काहीही करून काम संपवून दि. २७ मार्च रोजी सकाळी पूल वाहतुकीसाठी खुला करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत.