सिंधुदुर्गातून फरार आरोपीला मडगाव पोलिसांकडून अटक

सावंतवाडी येथील कारागृहातून मे २०२२ मध्ये पळाला होता

|
31st January 2023, 12:03 Hrs
सिंधुदुर्गातून फरार आरोपीला  मडगाव पोलिसांकडून अटक

प्रतिनिधी। गोवन वार्ता            

मडगाव : सिंधुदुर्गमधील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी संशयित आरोपी प्रमोद परब (४८) सावंतवाडी येथील कारागृहातून मे २०२२ मध्ये पळून गेला होता. या संशयिताला आठ महिन्यांनंतर मडगाव पोलिसांनी अटक केली. त्याला सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.            

मिळालेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ पडवे येथील संशयित प्रमोद मधुकर परब याच्यावर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी भा.दं.सं. व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंद आहे. त्याला अटक करून सावंतवाडी येथील कारागृहात ठेवले असता २४ मे २०२२ रोजी त्याने पलायन केले. सदर संशयित मडगाव पोलीस ठाण्याच्या परिसरात वास्तव्यास होता. हमाल म्हणून तो काम करत होता. मडगाव पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी शोध सुरू केला होता. सोमवारी पोलिसांनी संशयित प्रमोद परब याला ताब्यात घेऊन चौकशीअंती अटक केली. सदर संशयिताला सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे मडगाव पोलिसांनी सांगितले.