समुद्रात खनिजवाहू बार्ज बुडाली

बार्जमधील आठ क्रू मेंबर्स सुखरूप किनारी

|
30th January 2023, 11:54 Hrs
समुद्रात खनिजवाहू बार्ज बुडाली

समुद्रात बुडताना खनिजवाहू बार्ज.

प्रतिनिधी । गोवन वार्ता

वास्को : मुरगाव बंदरापासून काही अंतरावर नांगरण्यात आलेली ‘रिओ मार्टिना ३’ ही खनिजवाहू बार्ज सोमवारी सायंकाळी उशिरा  बुडाली. या बार्जवर आठ क्रू मेंबर्स होते. त्या सर्वांना दुसऱ्या एका बार्जद्वारे सुखरूपपणे वाचवण्यात आले.       

खनिज घेऊन आलेली सदर बार्ज मुरगाव बंदरापासून काही अंतरावर असलेल्या ब्रेक वॉटरजवळ नांगरण्यात आली होती. या बार्जमधील खनिज जहाजामध्ये उतरवण्याचे काम सुरू होते. बार्जमधील अर्धे खनिज उतरवण्यात आल्यावर  समुद्राला उधाण आल्याने, तसेच सोसाट्याचा वारा सुटल्याने खनिज उतरवण्यास अडचण निर्माण झाली. त्यामुळे  काम बंद ठेवण्यात आले होते. समुद्राला उधाण आल्याने व सोसाट्याचा वारा सुटल्याने खनिज उतरून घेताना बार्ज व जहाज एकमेकावर आपटण्याची शक्यता होती. त्या दरम्यान काम थांबवण्यात येऊन जहाजापासून काही अंतरावर बार्ज नांगरण्यात आली असावी, असे समजते.      

समुद्राला उधाण व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे  बार्जला हेलकावे बसू लागले असावेत. त्यामुळे इंजिन रूममध्ये पाणी शिरून काही अडचणी निर्माण झाल्या असाव्यात. बार्ज बुडण्याची शक्यता लक्षात घेऊन बार्जवरील क्रू मेंबर्सनी खबरदारीची उपाययोजना म्हणून मदतीसाठी हाक दिली. त्यामुळे तेथे असलेली एक बार्ज मदतीसाठी आली. त्या बार्जवर ‘रिओ मार्टिना ३’ वरील आठही क्रू मेंबर्सना घेण्यात आले. त्यानंतर पाणी शिरल्याने ‘रिओ मार्टिना ३’ बार्ज बुडाली.