‘लाईव्हलीहूड’खालील स्वयंसहाय्य गट येणार ‘आरडीए’च्या अंतर्गत

कार्यक्रम अंमलबजावणी, पारदर्शकतेसाठी सरकारचा निर्णय

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
30th January 2023, 11:46 pm
‘लाईव्हलीहूड’खालील स्वयंसहाय्य गट येणार ‘आरडीए’च्या अंतर्गत

पणजी : ग्रामविकास खात्याअंतर्गत येणाऱ्या गोवा लाईव्हलीहूड मिशनखाली नोंद असलेले सर्व स्वयंसहाय्य गट ग्रामविकास खात्याअंतर्गत (आरडीए) आणण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. वित्त खात्याचे अवर सचिव प्रेमराज शिरोडकर यांनी त्यासंदर्भातील परिपत्रक जारी केले आहे.
ग्रामविकास खात्याअंतर्गत येणाऱ्या गोवा लाईव्हलीहूड मिशन मंडळाची बैठक नुकतीच झाली. या बैठकीत मिशनअंतर्गत नोंद असलेले सर्व स्वयंसहाय्य गट ‘आरडीए’अंतर्गत आणण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या सर्व गटांवर यापुढे लाईव्हलीहूड मिशन मंडळ आणि ‘आरडीए’चे नियंत्रण राहणार आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना स्वयंसहाय्य गटांपर्यंत पोहोचावे, लाईव्हलीहूड मिशनचे सर्व कार्यक्रम राज्यातील सर्व स्वयंसहाय्य गटांनी राबवून त्याचा फायदा स्थानिक जनतेला करून द्यावा तसेच या सर्व प्रक्रियेत पारदर्शकता यावी, या हेतूनेच सर्व स्वयंसहाय्य गट ‘आरडीए’अंतर्गत आणण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, असे शिरोडकर यांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
दरम्यान, राज्यातील विविध भागांतील स्वयंसहाय्य गटांनी लाईव्हलीहूड मिशनअंतर्गत नोंदणी केलेली आहे. मिशनचे विविध उपक्रम राबवून महिला तसेच ग्रामीण भागांना ​आर्थिकदृष्ट्या बळकटी देण्यासाठी राज्य सरकार वर्षाला या गटांना कोट्यवधी रुपयांचे अर्थसहाय्य देत असते. हे अर्थसहाय्य घेऊन अनेक भागांतील महिलांनी गेल्या काही वर्षांत स्वयंरोजगार स्थापन करून इतर महिलांनाही आधार मिळवून दिलेला आहे. काही महिलांच्या गटांनी बनलेले पदार्थ तसेच इतर वस्तूंची देश-विदेशांत प्रदर्शनेही भरवण्यात आलेली आहेत.

हेही वाचा