राज्यात २४ महिलांना स्तनांचा कॅन्सर; १,२४१ जणींना लागण झाल्याचा संशय

५० हजार महिलांच्या तपासणीतून आले समोर

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
30th January 2023, 11:46 pm
राज्यात २४ महिलांना स्तनांचा कॅन्सर; १,२४१ जणींना लागण झाल्याचा संशय

पणजी : राज्यात ३० ते ५० वयोगटातील महिलांमध्ये स्तनाच्या कॅन्सरचे प्रमाण जास्त आहे. राज्यातील ५० हजार महिलांची चाचणी केल्यानंतर त्यात १ हजार २४१ महिलांना स्तनांचा कॅन्सर झाल्याचा संशय होता. यांतील २४ महिलांना त्याची लागण झाल्याचे निश्चित झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली. राज्यात वर्षाकाठी सरासरी १ हजार ५०० जणांना कॅन्सरची लागण झाल्याचे आढळून येत आहे, असे डॉ. अनुपमा बोरकर यांनी यावेळी सांगितले.
येथील एका हॉटेलमध्ये जागतिक कॅन्सर दिवसानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत वरील माहिती देण्यात आली. यावेळी गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर उपस्थित होते.
राज्यात ‘स्वस्थ महिला, स्वस्थ गोवा’ उपक्रमाखाली महिलांसाठी स्तनांच्या कॅन्सरसंबंधी तपासणी केली जाते. या उपक्रमाखाली आतापर्यंत ५० हजार १९ महिलांची तपासणी करण्यात आली आहे. यात १ हजार २४१ महिलांमध्ये या कॅन्सरची लागण झाल्याचा संशय आहे. हे प्रमाण २.४८ टक्के इतके आहे. यातील २४ महिलांना त्याची लागण झाल्याचे निश्चित झाले आहे. संशयित रुग्णांमध्ये कॅन्सरची लक्षणे आढळलेली नाहीत. त्यामुळे आणखी सखोल चाचणी करावी लागणार आहे. त्यानंतरच अंतिम निश्चित होईल, असे डॉक्टरांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, २१ ते ३० वयोगटातील तरुण तरुणींमध्ये अ‍ॅटॅक येण्याचे प्रमाण वाढले आहे. ही बाब चिंताजनक आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.

राज्यात विशेष कॅन्सर इस्पितळ उभारले जात आहे. यासाठी गोवा सरकारी, केंद्र सरकार आणि टाटा मेमोरियल इस्पितळासोबत करार केला जाणार आहे. यासाठी समन्वय अधिकारी म्हणून डॉ. कैलास शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा