या वर्षीचे प्लानिंग करताय? जाणून घ्या शाळांच्या सुट्ट्या आणि इतर गोष्टी


30th January 2023, 10:17 pm
या वर्षीचे प्लानिंग करताय? जाणून घ्या शाळांच्या सुट्ट्या आणि इतर गोष्टी


प्रतिनिधी। गोवन वार्ता

पणजी : गोव्यातील शाळांसाठी २०२३-२४ मधील शैक्षणिक वर्षातील सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. सोमवार ५ जून २०२३ रोजी शाळांची पहिली टर्म सुरू होईल. ७ नोव्हेंबरपर्यंत शैक्षणिक वर्षाची पहिली टर्म असेल. ८ ते २६ नोव्हेंबर असे सुमारे १९ दिवस शाळांना दिवाळीची सुट्टी असेल. २७ नोव्हेंबर २०२३ ते ३० एप्रिल २०२४ या काळात शैक्षणिक वर्षाची दुसरी टर्म असेल.

२०२३-२४ या शैक्षणिक वर्षी गणेश चतुर्थीची सुट्टी १८ ते २४ सप्टेंबर अशी सात दिवस असेल. दिवाळीची सुट्टी १९ दिवसांची असून ती ८ ते २६ नोव्हेंबर या काळात देण्यात येईल. २४ डिसेंबर रोजी रविवार असल्यामुळे नाताळच्या सुट्टीला २५ डिसेंबरपासून सुरुवात होईल. सोमवारपासून सुट्टी धरली तर २ जानेवारी २०२४ पर्यंत दहा दिवस सुट्टी होईल. त्यानंतर उन्हाळी सुट्टी १ मे ते ३ जून २०२४ पर्यंत असेल.

प्राथमिक ते उच्च माध्यमिक विद्यालयांसाठी २०२३-२४ च्या शैक्षणिक वर्षात परीक्षांचे दिवस धरून २२० पेक्षा कमी कामाचे दिवस होऊ नयेत. ६ नोव्हेंबर २०२३ पर्यंत पहिल्या टर्मच्या परीक्षा तसेच ६ एप्रिलपूर्वी दुसऱ्या टर्मच्या परीक्षा घ्याव्या. २९ एप्रिलपूर्वी निकाल जाहीर करू नयेत. शाळांची रोजची वेळ ही साडे पाच तासांपेक्षा कमी नसावी, असे शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

.................

असे असेल नियोजन

५ जून ते ७ नोव्हेंबर : पहिली टर्म

२७ नोव्हेंबर ते ३० एप्रिल : दुसरी टर्म

गणेश चतुर्थी सुट्टी : १८ ते २४ सप्टेंबर

दिवाळी सुट्टी : ८ ते २६ नोव्हेंबर

नाताळ सुट्टी : २५ डिसेंबर ते २ जानेवारी २०२४

उन्हाळी सुट्टी : १ मे ते ३ जून २०२४