ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅममध्ये सानिया-बोपण्णाला मिश्र दुहेरीत उपविजेतेपद

अजिंक्यपदाच्या लढतीत ब्राझीलच्या जोडीकडून पराभव

|
27th January 2023, 11:07 Hrs
ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅममध्ये  सानिया-बोपण्णाला मिश्र दुहेरीत उपविजेतेपद

न्यूज डेस्क। गोवन वार्ता      

मेलबर्न : सानिया मिर्झाला तिच्या शेवटच्या ग्रँड स्लॅममध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत सानिया आणि रोहन बोपण्णा यांचा ६-७, ६-२ असा पराभव झाला.       

हे सानियाचे शेवटचे ग्रँड स्लॅम असल्याचे सानियाने आधीच जाहीर केले होते. यानंतर ती महिला दुहेरीत दुसऱ्या फेरीत बाहेर पडली आणि मिश्र दुहेरीत तिला अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवाने सानियाचे विजयी निरोपाचे स्वप्न भंगले. ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत लुईसा स्टेफनी आणि राफेल मॅटोस या ब्राझीलच्या जोडीने सानिया आणि रोहन यांचा ६-७, २-६ अशा फरकाने पराभव केला.      

सानिया मिर्झाने तिच्या कारकिर्दीत तीन महिला दुहेरी ग्रँड स्लॅम आणि तीन मिश्र दुहेरी विजेतेपदे जिंकली आहेत. तर बोपण्णाने मिश्र दुहेरीचे एक ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावले आहे. सानिया आणि बोपण्णा या बिगरमानांकित भारतीय जोडीने ऑस्ट्रेलियन ओपन २०२३ च्या उपांत्य फेरीत डेसिरिया क्रॉझिक आणि नील स्कुप्स्की यांचा ७-६ (५), ६-७ (५), १०-६ असा पराभव केला. या जोडीला उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात वॉकओव्हर मिळाला होता. भारतीय जोडीने उरुग्वे आणि जपानी जोडी एरियल बेहार आणि मकाटो निनोमिया यांचा ६-४, ७-६ (११-९) असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली.      

अंतिम फेरीत लय गमावली      

या स्पर्धेतील अंतिम सामन्यापूर्वी सानिया आणि रोहन बोपण्णा जोडीने केवळ एक सेट गमावला होता. उपांत्य फेरीच्या सामन्यात या जोडीला एका सेटमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. अंतिम सामन्यात ही जोडी अजिबाद लयमध्ये नव्हती आणि विजेतेपदासाठी सरळ सेटमध्ये पराभूत झाले. दरम्यान, बोपण्णा आणि मॅथ्यू एबडेन ही पुरुष दुहेरी जोडी पहिल्याच फेरीत पराभूत झाली. महिला दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत सानिया आणि कझाकस्तानची अॅना डॅनिलिना यांना पराभवाचा सामना करावा लागला.      

सानियाची मिर्झाची कारकीर्द      

सानियाने तिच्या कारकिर्दीत ४३ डब्ल्यूटीए विजेतेपद पटकावले. तिने महिला दुहेरी प्रकारात तीन ग्रँड स्लॅम विजेतेपदेही जिंकली. २०१६ मध्ये ती ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये महिला दुहेरी चॅम्पियन देखील बनली. सानियाने मिश्र दुहेरीतही तीन ग्रँड स्लॅम जिंकले आहेत. २००९ मध्ये तिने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये या प्रकारात विजेतेपद पटकावले होते. सानियाने महिला दुहेरीच्या क्रमवारीत बराच काळ अव्वल स्थान राखले होते. मात्र, कारकिर्दीतील शेवटच्या ग्रँड स्लॅममध्ये ती विजयापासून एक पाऊल दूर राहिली.