जमीन हडप प्रकरणी सुहैल याला आठव्यांदा अटक!

म्हापसा न्यायालयाने ठोठावला तीन दिवसांचा रिमांड

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
24th January 2023, 11:44 Hrs
जमीन हडप प्रकरणी सुहैल याला आठव्यांदा अटक!

पणजी : हणजूण येथील सर्वे क्रमांक ४९३/२ मधील जमीन हडप प्रकरणी विशेष चौकशी पथकाने (एसआयटी) संशयित मोहम्मद सुहैल उर्फ मायकल या मुख्य सूत्रधाराला अटक केली आहे. ही या प्रकरणातील आठवी अटक आहे. तर, अशा प्रकरणांत संशयिताला आठव्यांदा अटक झाली आहे.
मुंबईस्थित झेवियर रुझारियो पेरेरा या मूळ जमीन मालकाने एसआयटीकडे तक्रार दाखल केली होती. संशयित ब्रांका दिनिज, पावलिना दिनिज, मारियानो गोन्साल्विस आणि राॅयसन्स रॉड्रिग्ज यांनी हणजूण येथील सर्वे क्रमांक ४९३/२ मधील सुमारे ९५० चौ.मी. जमिनीचे १९५१ मधील बनावट विक्रीपत्र (सेल डीड) तयार केले. त्यानंतर संशयितांनी ६ ऑगस्ट २०२१ रोजी बनावट वारसदार प्रमाणपत्र (सक्सेशन डीड) तयार करून बार्देश मामलेदारांकडून म्युटेशन करवून घेतले, असे त्या तक्रारीत पेरेरा यांनी नमूद केले आहे.
पेरेरा यांच्या तक्रारीची दखल घेऊन एसआयटीचे प्रमुख तथा पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक नितीन हळर्णकर यांनी वरील संशयितांविरुद्ध भा.दं.सं.च्या कलम ४६५, ४६६, ४६७, ४७१, ४१९, ४२० व आर डब्ल्यू ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. या प्रकरणी एसआयटीने ज्येष्ठ नागरिक मारियानो गोन्साल्वीस व पाल्मिरा गोन्साल्वीस यांच्यासह राॅनी रॉड्रिग्ज आणि राॅयसन्स रॉड्रिग्ज या संशयितांना अटक केली होती. न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, या प्रकरणी मुख्य सूत्रधार सुहैल यानेही अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने तो फेटाळून लावला. आता या प्रकरणी एसआयटीने सुहैल याला आठवा संशयित म्हणून अटक केली आहे. त्याला म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी ठोठावली आहे.