कुटुंबामुळे क्रिकेट आणि व्यवसायात ताळमेळ शक्य : मुख्तार काद्री


24th January 2023, 11:05 pm

प्रतिनिधी। गोवन वार्ता

पणजी : भारतात क्रिकेट सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. हा खेळ खेळणाऱ्या खेळाडूंना नेहमीच या खेळाची एक वेगळीच ओढ असते. असाच एक उत्कृष्ट आक्रमक मध्यमवयीन खेळाडू म्हणजे पीजीएमएल २.० मधील प्रायॉरिटी टायटन्स या संघाचा कर्णधार मुख्तार काद्री. 

मुख्तारने लहानपणीच क्रिकेट खेळण्यास सुरवात केली आणि या खेळाला आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा भाग बनवला. वर्तमानात तो एक खेळाडू आहेच शिवाय एका क्रीडा साहित्य दुकानाचा मालकही आहे. त्याचा या क्रिकेटमधील प्रवासाबद्दल अधिक माहिती घेण्यास त्याच्याशी साधलेला हा संवाद. 

प्रश्न : क्रिकेटसाठी तुझी आवड कधी आणि कशी सुरु झाली?

मुख्तार : क्रिकेट माझ्यासाठी लहानपणापासून नेहमीच पहिले प्रेम राहिले आहे. शाळा संपल्यानंतर मी नेहमीच क्रिकेट खेळायचो. तेव्हापासून हा खेळ माझ्या आयुष्याचा एका भाग बनला आहे. क्रिकेट खेळण्याची संधी मी कधीच गमावली नाही आणि या पुढेही गमावणार नाही.

प्रश्न : जीवनाच्या इतर पैलूंमध्ये क्रिकेटने तुला कशी मदत केली?

मुख्तार : हा खेळ मी लहानपणापासून खेळात आहे. मी १६, व १९ वर्षांखालील गोवा संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. क्रिकेटच माझे आयुष्य आहे. क्रिकेटशिवाय मी जगू शकत नाही. क्रिकेट माझा धर्म आहे. जीवनात या खेळाने मला धाडसी आणि मानसिकदृष्ट्या मजबूत बनवले आहे. यासाठी मी क्रिकेटचा ऋळी आहे.

प्रश्न : तुझ्यासाठी पीजीएमएल २.० कसा चालला आहे?.

मुख्तार : हो नक्कीच. मागच्या हंगामात मी धेंपो चॅलेंजर्स या संघासाठी खेळलो होता. यावर्षी मी प्रायॉरिटी टायटन्स या संघाचा भाग आहे. मागच्या हंगामापेक्षा मी यावर्षी अधिक चांगला खेळण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्यासाठी माझ्या वैयक्तिक आकडेवारीपेक्षा संघाचा विजय अधिक महत्त्वाचा आहे.

प्रश्न : पीजीएमएल तरुण प्रतिभांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यास मदत करेल का?

मुख्तार : नक्कीच. पीजीएमएलने पणजीत पुन्हा क्रिकेटला नवी ओळख मिळवून दिली आहे. अशा प्रकारची क्रिकेट लीग राज्यात कुठेही नाही. ही लीग आयपीएल सारखीच आहे. पणजी जिमखानाने या लीगची ब्रँडींग चांगली केली आहे. तसेच माझ्या मते मुलांनी मोबाईल सोडून मैदानावर येऊन अनेक खेळ खेळावे.