इफ्फी : आयोजनाचे सिंहावलोकन

महोत्सवाचा दर्जेदार प्रेक्षक वर्ग जपून ठेवायचा असेल तर सातत्याने होणाऱ्या काही त्रुटी टाळल्या पाहिजेत. आंतरराष्ट्रीय दर्जा ठेवण्यासाठी जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय कलाकार, तंत्रज्ञ येणेही महत्त्वाचे आहे.

Story: विशेष | जयश्री देसाई |
03rd December 2022, 09:10 pm
इफ्फी : आयोजनाचे सिंहावलोकन

गोव्याच्या राजधानी पणजीत नुकताच भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) पार पडला. जगभरातील दर्जेदार सिनेमांसह देशातील आशयसंपन्न सिनेमांसाठी हा महोत्सव म्हणजे पर्वणीच असते. गोव्यातील चित्रपट निर्मात्यांनाही गोव्यासाठी असलेल्या विशेष विभागातून प्रोत्साहन मिळते. तसे पाहायला गेले तर चित्रपट निर्मात्यांसह, चित्रपट जाणकार व रसिकांसाठी हा महोत्सव एक मोठी संधी असतो. जगभरातील सिनेमा समजून घेण्याची, विविध विषयातील तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्याची, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, तंत्रज्ञ यांच्याशी संवाद साधण्याची संधी. महोत्सवात येणारा प्रत्येक व्यक्ती या नऊ दिवसांच्या कालावधीत कितीतरी बरे वाईट अनुभव घेऊन परत जातो. पण यावर्षीचा रसिक बराच मनस्ताप आणि असमाधान सोबत घेऊन गेला. असेच म्हणावे लागेल. त्याचे सर्वात महत्त्वाचे कारण जर काही असेल तर खूप कमी जणांना आपल्या आवडीचे चित्रपट पाहता आले. तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेता आले. बहुतांश चित्रपटप्रेमींना हवे असणारे चित्रपट पाहताच आले नाही. मास्टरक्लाससाठी तिकीट बुकिंग न झाल्यामुळे कित्येकांना प्रवेश मिळाला नाही. स्वयंसेवकांच्या उद्धट उत्तरांमुळे अधिकचा मनस्ताप सहन करावा लागला.

 २००४ पासून इफ्फी गोव्यात स्थिरावला. तेव्हापासून या महोत्सवासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून काही चित्रपट रसिक येत असतात. सुरुवातीची काही वर्षे महोत्सवाचा दर्जा टिकून होता. मात्र हळूहळू व्यावसायिकीकरण आल्याने सद्यस्थितीत होणारे महोत्सव हे कला केंद्रित कमी व नफा मिळविण्याचे केंद्र अधिक झाले आहेत. असे मत नियमित येणाऱ्या काहींनी व्यक्त केले. याचे स्पष्ट उदाहरणच द्यायचे झाले तर उदघाटन व सांगता समारंभाचे अधिकार ठराविक कंपन्यांना विकले जातात. या कंपन्यांना हवे असणारे कलाकार सोहळ्यास हजेरी लावतात. यासोबत महोत्सवात होणारे मास्टर क्लासचे अधिकार कुणीतरी घेतलेले असतात. एरवी पत्रकार परिषदा पीआयबीच्या युट्युब चॅनेलवर थेट प्रक्षेपित केल्या जातात. पण मास्टरक्लासची अशी काही सोय नाही. मर्यादित आसनक्षमता असणाऱ्या सभागृहात होणारे मास्टरक्लास केवळ मर्यादित लोकांना करता येतात. नंतर काही काळाने ते उपलब्ध केले जातात. पण तिथे येऊन प्रत्यक्ष सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांची प्रचंड निराशा झाली. 

आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील, जागतिक सिनेमा विभागातील बहुतांश चित्रपट यावर्षी पर्वरी येथील आयनॉक्समध्ये दाखविण्यात आले. पणजीतून पर्वरीला जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था असली तरी येण्याजाण्याच्या वेळा पाहता ते खूप गैरसोयीचे झाल्याचे काही प्रेक्षकांनी सांगितले. चित्रपट पाहण्यासही तिकिटांचा घोळ होताच.

सकाळी आठ वाजता सर्व तिकिटे खुली होत असत. त्यामुळे अनेक जण आठ वाजता अँप्लिकेशन उघडून तिकिटे बुक करत. मात्र असे करूनही अनेक चित्रपटांची तिकिटे उपलब्ध होत नसत. सगळ्या चित्रपटांच्या बुकिंगला तिकीट उपलब्ध नाही असे झाल्यामुळे बऱ्याच जणांचा संताप अनावर झाला होता. मॅकॅनिज पॅलेसच्या सभागृहाबाहेर प्रसिद्ध कलाकार व तंत्रज्ञांच्या मास्टरक्लाससाठी रोज असे काही रसिक आपला राग व्यक्त करताना दिसले. ए. आर. रहमान यांच्या मास्टरक्लाससाठी मुंबईवरून आलेल्या एका चित्रपट निर्मात्यानी सुरुवातीला स्वयंसेवकांना विनंती केली. आम्ही उभे राहायला तयार आहोत, खुर्च्यांवर न बसता खाली बसू असे सांगूनही स्वयंसेवकांच्या बेफिकीर वागण्याचा त्यांना राग आला. नंतर त्यांनी मोठमोठ्याने ओरडायला सुरुवात केली. तरीही फारसा फरक पडला नाही. त्याही मागे हटल्या नाहीत. आयोजकांना बोलवा, पण आम्हाला आत पाठवा अशी मागणी त्यांनी केली. दोन तीन ऑफिसमध्ये जाऊन आल्या. महोत्सवासाठी तैनात करण्यात आलेले पोलीस तिथे आले. मात्र त्यांनीही तिकिटाशिवाय आत सोडले जाणार नाही असे सांगितले. शेवटी १ तास हुज्जत घातल्यावर मास्टरक्लास सुरु होऊन अर्धा वेळ झाल्यावर आयोजकांनी बाहेरच्या सर्वांना आतमध्ये जायला परवानगी दिली. हा वाद घालणाऱ्या तनु शर्मा त्यावेळी सर्वांसाठी हिरो झाल्या. पैसे देऊन नोंदणी करून, ९ दिवस हॉटेलमध्ये राहण्याचा, खाण्याचा खर्च करूनही जर हवे असणारे चित्रपट पाहता आले नाहीत तर काय फायदा हा त्यांचा मुद्दा नक्कीच रास्त होता. आयोजकांचा चित्रपट आसनक्षमतेचा प्रश्न समजता येऊ शकतो. मास्टरक्लाससाठी सभागृहाबाहेर एखादा एलईडी पडदा लावला असता, तर कदाचित रसिकांची अशी निराशा झाली नसती.      

दरवर्षी ठिकठिकाणी उभे केले जाणारे स्वयंसेवक प्रशिक्षित असावेत असा मुद्दा उठवला जातो. मात्र ये रे माझ्या मागल्या याप्रमाणे दरवर्षी महाविद्यालयीन तरुणांनाच उभे केले जाते. या तरुण, तरुणींना कलाकार माहीत नसतात. लोकांशी बोलण्याचे तारतम्य नसते.  यावर्षी फ्रान्स कंट्री फोकस होती. महोत्सवाच्या दरम्यान फ्रान्सच्या एका प्रतिनिधीला कार्ड नाही म्हणून या तरुणांनी अडवले. त्याने विनंती करूनही त्याला दाद दिली नाही. त्याला कार्यालयात जायला सांगितले. पण त्याच्या समस्येवर तोडगा काही निघाला नाही. आपण केवळ स्वयंसेवक म्हणून नाही तर राज्य, देश म्हणून समोरच्याशी बोलत असतो, वागत असतो. हे या तरुणांना कळतच नाही. बाहेरून आलेल्या लोकांनी विचारलेला एखादा पत्ताही हे लोक धड सांगत नाहीत अशा तक्रारीही कानावर आल्या. 

यंदा कोविडनंतर ऑफलाईन पद्धतीने इफ्फी झाला. म्हणून ढीगभर प्रतिनिधींची नोंदणी करण्यात आली. माध्यम, विद्यार्थी व इतर प्रतिनिधी मिळून १० हजाराच्या आसपास नोंदणी केली गेली. पण इतक्या सगळ्या लोकांना सर्व चित्रपट पाहता येतील का? किमान त्यांच्या आवडीचे चित्रपट पाहता येतील का? याचा विचार होणे गरजेचे होते. जो झाला नाही. यासोबत स्थानिक माध्यम प्रतिनिधींना वेगळ्याच समस्यांना सामोरे जावे लागले. राष्ट्रीय माध्यम प्रतिनिधींना सर्व कलाकारांच्या मुलाखती घेता आल्या. त्यांचे बाइट्स घेता आले. अशावेळी स्थानिक प्रतिनिधींना कुठेच विचारात घेतले गेले नाही. 

नियोजनाच्या पातळीवर खूप अस्ताव्यस्तता दिसून आली. तरी गोवा विभागात दाखविण्यात आलेले राज्यातील ६ लघुपट व १ माहितीपट यामुळे स्थानिक चित्रपट निर्मात्यांना प्रोत्साहन मिळाले. स्थानिकांसाठी विशेष प्रशिक्षण घेतले गेले. विशेष म्हणजे दिव्यांग बांधवांना थिएटरमध्ये सिनेमा अनुभवता यावा म्हणून विशेष बदल केलेले चित्रपट दाखवले गेले. या सिनेमांमध्ये काही प्रसंग ध्वनीरूपात वर्णन करण्यात आले होते. दिव्यांगांनी या संधीचा आनंदाने लाभ घेतला. 

सांगता समारंभात नदाव लापीद या प्रमुख परीक्षकाने काश्मीर फाईल्सवर केलेल्या विधानामुळे महोत्सवाला गालबोट लागले. यानिमित्ताने महोत्सवात स्पर्धेसाठी कोणते चित्रपट असावेत हा एक चर्चेचा मुद्दा बनला आहे. त्याच्या या विधानावर अनेक संक्षिप्त प्रतिक्रिया उमटल्या. त्यामुळेही महोत्सव लक्षात राहणार आहे. शेवटी प्रत्येक कार्यक्रम पूर्णतः नीटनेटका पार पडण्याची शक्यता तशी कमीच असते. मात्र महोत्सवाचा दर्जेदार प्रेक्षक वर्ग जपून ठेवायचा असेल तर सातत्याने होणाऱ्या काही त्रुटी टाळल्या पाहिजेत. आंतरराष्ट्रीय दर्जा ठेवण्यासाठी जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय कलाकार, तंत्रज्ञ येणेही महत्त्वाचे आहे.