कळंगुटमधील रिसॉर्टमध्ये रशियन तरुणीवर दोन रूमबॉयकडून बलात्कार

तक्रार दाखल होताच दोन्ही संशयितांना अटक

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
02nd December 2022, 11:58 Hrs
कळंगुटमधील रिसॉर्टमध्ये रशियन तरुणीवर दोन रूमबॉयकडून बलात्कारम्हापसा : कळंगुट येथील एका रिसॉर्टमध्ये ३७ वर्षीय रशियन पर्यटक तरुणीवर रूमबॉयनीच बलात्कार केल्याचा प्रकार शुक्रवारी समोर आला. या प्रकरणी पोलिसांनी संशयित शकील अन्सारी उर्फ सलमान झिरा जलाह (२३) व सहिमुद्दीन अन्सारी अब्दुल अली (२२) या दोघा रूमबॉयना अटक केली आहे. दोन्ही संशयित नेपाळमधील बर्दीया गावचे रहिवासी आहेत. ही घटना गुरुवारी रात्री १० ते ११ च्या सुमारास घडली.

पोलिसांत दाखल झालेल्या तक्रारीनुसार, रशियातील १८ जणांचा पर्यटक गट गुरुवारीच गोव्यात दाखल झाला होता. हे पर्यटक कळंगुटमधील रिसॉर्टमध्ये उतरले होते. पीडित व तिच्या दोन मैत्रिणी एका खोलीमध्ये वास्तव्यास होत्या. तिच्या मैत्रिणी रात्री अन्य मित्रासह रिसॉर्टच्या आवारात फिरायला गेल्या होत्या. त्यांनी हॉटेल व्यवस्थापकाला खोलीच्या प्रसाधनगृहाची स्वच्छता करायला सांगितली होती. त्यावेळी पीडित तरुणी खोलीतच असल्याची कल्पना त्यांना नव्हती.
व्यवस्थापकाने सांगितल्यानंतर संशयित सहिमुद्दीन अन्सारी हा त्या खोलीत स्वच्छतेसाठी गेला. त्यानंतर काही वेळाने संशयित शकील अन्सारी हा देखील त्या खोलीत घुसला. तेव्हा ती रशियन तरुणी विवस्त्र अवस्थेत झोपल्याचे पाहून त्याने तिच्यावर बलात्कार केला. थोड्यावेळाने सहिमुद्दीन हा स्वच्छता करून बाहेर आला आणि त्यानेही तिच्यावर अत्याचार केला. मैत्रिणी खोलीवर परतल्यानंतर पीडित तरुणीने त्यांना घडला प्रकार सांगितला. त्यानंतर शुक्रवारी सकाळी हॉटेल व्यवस्थापक आणि तरुणीने पोलिसांत तक्रार दिली. त्या तक्रारीत संशयितांची नावेही देण्यात आली होती.

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संध्याकाळी भा.दं.सं.च्या ३७६ कलमाखाली गुन्हा नोंद केला व दोन्ही संशयितांना पकडून अटक केली. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तगुरु सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रगती मळीक करत आहेत.