जर्मनीच्या प्रवासाला पूर्णविराम!

अखेरच्या सामन्यात कोस्टा रिकावर मात


02nd December 2022, 11:45 pm
जर्मनीच्या प्रवासाला पूर्णविराम!

न्यूज डेस्क। गोवन वार्ता

दोहा : चार वेळचा चॅम्पियन जर्मनी फिफा विश्वचषक २०२२ मधून बाहेर पडला आहे. गुरुवारी (२ नोव्हेंबर) उशिरा खेळल्या गेलेल्या गट-ईच्या त्यांच्या शेवटच्या सामन्यात जर्मनीने कोस्टा रिकाचा ४-२ असा पराभव केला, परंतु गोल फरकाच्या आधारे ते स्पॅनिश संघापेक्षा मागे राहिले. स्पेन-जर्मनीचे समान ४ गुण होते. तीन सामन्यांचा समावेश करून पाहिल्यास, स्पेनने नऊ गोल केले, तर त्यांच्याविरुद्ध केवळ ३ गोल झाले.

दुसरीकडे, जर्मनीने ६ गोल केले आणि ५ गोल स्वीकारले. अशा स्थितीत स्पेनचा गोल फरक जास्त चांगला होता. जपान आणि स्पेनने गट-ईमधून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. तसे पाहिले तर, जर्मनी सलग दुसऱ्यांदा ग्रुप स्टेजमधून बाहेर पडला आहे.

जर्मनीने पुढील फेरी गाठण्यासाठी कोस्टा रिकाविरुद्धच्या विजयासह सर्व आशा स्पेन-जपान सामन्याच्या निकालावर लागल्या होत्या. जर स्पॅनिश संघाने जपानला पराभूत केले असते तर जर्मनीने पुढील फेरी गाठली असती, परंतु जपानी संघाने स्पेनला २-१ ने पराभूत करून पुढील फेरीत जागा निश्चित केली. जपानने सहा गुणांसह गटात अव्वल स्थान मिळवले.

या सामन्यात अल्वारो मोराटाच्या गोलमुळे स्पेन १-० ने आघाडीवर होता, पण रित्सू डॉनच्या (४८व्या मिनिटाला) गोलमुळे जपानने १-१ अशी बरोबरी साधली. त्यानंतर ५१व्या मिनिटाला तनाकाने गोल करून जपानला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर स्पॅनिश संघाला एकही गोल करता आला नाही आणि जपानच्या संघाने हा सामना जिंकून पुढील फेरीत प्रवेश केला.

जर्मनी-कोस्टा रिका सामना

जर्मनीने १०व्या मिनिटाला सर्ज ग्नॅब्रीच्या हेडरने आघाडी घेतली. मात्र, यानंतर जर्मनीच्या संघाला पूर्वार्धात एकही गोल करता आला नाही आणि स्कोअर १-० असा त्याच्या बाजूने होता. उत्तरार्धात सामन्याच्या ५८व्या मिनिटाला येल्तसिन तेजेदाने रिबाऊंडवर उत्कृष्ट गोल केल्याने कोस्टा रिकाने बरोबरी साधली.

७०व्या मिनिटाला जर्मन गोलरक्षक मॅन्युएल न्युअरच्या स्वयं गोलमुळे कोस्टा रिकाने २-१ अशी आघाडी घेतली. २-१ ने पिछाडीवर पडल्यानंतरही जर्मनीचा उत्साह खचला नाही. परिणामी, काई हॅव्हर्ट्झने ७३व्या आणि ८५व्या मिनिटाला दोन गोल करून जर्मनीला ३-२ ने आघाडीवर नेले. नंतर निकलस फुलक्रुगनेही गोल नोंदवताना स्कोअर ४-२ असा केला. मात्र, हा विजयही जर्मनीसाठी पुरेसा ठरला नाही.

१४ संघांनी गाठली पुढील फेरी

एकूणच या विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीसाठी आतापर्यंत १४ संघ पात्र ठरले आहेत. या संघांमध्ये फ्रान्स, ब्राझील, पोर्तुगाल, नेदरलँड, सेनेगल, अमेरिका, इंग्लंड, पोलंड, अर्जेंटिना, मेक्सिको, क्रोएशिया, मोरोक्को, स्पेन आणि जपान यांचा समावेश आहे. या १४ संघांपैकी फक्त पोर्तुगाल आणि ब्राझील या संघांचा सामना कोणत्या देशाशी होणार हे अद्याप ठरलेले नाही, उर्वरित संघांचे उपउपांत्यपूर्व फेरीचे सामने निश्चित झाले आहेत.

को​रियाकडून पोर्तुगाल पराभूत

फिफा विश्वचषक २०२२ ने फुटबॉल जगताला चकित केले आहे. ग्रुप स्टेजच्या सुरुवातीपासून शेवटच्या सामन्यांपर्यंत या स्पर्धेत गोंधळ सुरूच होता. अर्जेंटिना, जर्मनी, बेल्जियम आणि स्पेननंतर ख्रिस्तियानो रोनाल्डोचा संघ पोर्तुगाललाही धक्कादायक निकालाला सामोरे जावे लागले. ग्रुप एच मधील त्यांच्या शेवटच्या सामन्यात पोर्तुगालला १-२ ने पराभवाचा सामना करावा लागला आणि हे आणखी एका आशियाई संघाने केले. दक्षिण कोरियाने युरोपियन शक्तीचा पराभव केला. यासह कोरियाने पुढील फेरीत प्रवेश केला. आणि त्याच गटातील दुसऱ्या सामन्यात उरुग्वेने घानाला २-० ने पराभूत केले पण तरीही गट फेरीतून बाहेर पडले.