‘एनडीटीव्ही इंडिया’चे रवीश कुमार यांचा राजीनामा

अदानी मूहाकडे ‘एनडीटीव्ही’ची मालकी : प्रणय रॉय, राधिका रॉय यांचाही रामराम

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
01st December 2022, 12:23 Hrs
‘एनडीटीव्ही इंडिया’चे रवीश कुमार यांचा राजीनामा

नवी दिल्ली : एनडीटीव्हीची संपूर्ण मालकी आता अदानी समूहाकडे आली आहे. या पार्श्वभूमीवर एनडीटीव्ही इंडिया या वृत्तवाहिनीचे वरिष्ठ कार्यकारी संपादक रवीश कुमार यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. एनडीटीव्हीचे प्रवर्तक प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांनी कालच वाहिनीच्या संचालक मंडळातून राजीनामा दिला होता. आज रवीश कुमार यांनी राजीनामा दिला आहे.

रवीश कुमार गेल्या अनेक वर्षांपासून एनडीटीव्हीमध्ये कार्यरत होते. एनडीटीव्ही या वृत्तसंस्थेशी रवीश कुमार १९९६ पासून जोडले गेले होते. एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीत रवीश कुमार यांचे हम लोग, रवीश की रिपोर्ट, देश की बात आणि प्राईम टाईम हे कार्यक्रम लोकप्रिय झाले.

रवीश कुमार यांनी थेट ग्राऊंड झिरोवर उतरुन माध्यमांमध्ये दुर्लक्षित होणाऱ्या विषयांना टीव्हीच्या पडद्यावर आणलं. रवीश कुमार यांना त्यांच्या पत्रकारितेतील कामाबद्दल दोनवेळा रामनाथ गोयंका या पत्रकारितेतील मानाच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. २०१९ मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कारानं देखील त्यांचा सन्मान करण्यात आला होता.

एनडीटीव्हीच्या चेअरमन सुपर्णा सिंह यांनी रवीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त केली. रवीश कुमार यांच्यासारखे लोकांवर प्रभाव टाकणारे कमी पत्रकार आहेत, हे त्यांच्याबाबत लोकांमधून उमटणाऱ्या प्रतिक्रियांवरुन दिसते, असे सुपर्णा सिंह म्हणाल्या. रवीश कुमार अनेक दशकांपासून एनडीटीव्हीशी संबंधित होते. एनडीटीव्हीमध्ये त्यांचे महत्त्वाचे योगदान होते, असेही त्या म्हणाल्या.

एनडीटीव्हीची संपूर्ण मालकी अदानी समूहाकडे

एनडीटीव्हीची संपूर्ण मालकी आता अदानी समूहाकडे आली आहे. मंगळवारी कंपनीच्या सचिव परिणिता भुतानी यांनी सेबीला पत्र लिहिले. त्यात एनडीटीव्हीची होल्डींग कंपनी असलेल्या आरआरपीआरएचच्या संचालक मंडळातून राधिका रॉय आणि प्रणय रॉय यांनी राजीनामा दिल्याचे कळविण्यात आले आहे. परिणामी एनडीटीव्हीचे प्रमोटर राधिका रॉय आणि प्रणय रॉय यांची आता कंपनीवरची मालकी संपुष्टात आली आहे. पण अजूनही रॉय दांपत्याकडे ३२.२६ टक्के शेअर्स आहेत. मात्र निर्णय प्रक्रियेवर त्यांचा प्रभाव नसेल.

राधिका रॉय आणि प्रणय रॉय यांच्या राजीनाम्यानंतर अदानी समूहाकडून सुदिप्ता भट्टाचार्य, संजय पुगलिया, सेंथिल चेंगलवरायन यांची तत्काळ आरआरपीआरएचच्या डायरेक्टरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापैकी संजय पुगलिया ज्येष्ठ पत्रकार आहेत. टीव्ही क्षेत्रात काम करण्याचा मोठा अनुभव त्यांच्याकडे आहे. वेगवेगळ्या राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांच्या संपादकपदी आणि ज्येष्ठ पत्रकार म्हणून त्यांनी काम केले आहे.

शेअर्सवर अदानी समूहाने असा मिळवला ताबा

अदानी समूहाने एनडीटीव्हीच्या शेअर्सचा मोठा हिस्सा विकत घेतला आहे. अदानी समूहाने एनडीटीव्हीमध्ये एक मोठा भाग खरेदी केला आहे आणि आता अजून २६ टक्के शेअर्स खरेदी करण्यासाठी एक खुली ऑफर जाहीर केली होती. प्रणय रॉय, राधिका रॉय आणि एनडीटीव्ही व्यवस्थापनाच्या इच्छेविरुद्ध अदानी समूहाने कंपनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. याला होस्टाईल टेकओव्हर असे म्हणतात.