मुंबई सिटी-एफसी गोवा आज आमनेसामने


30th November 2022, 10:52 pm

न्यूज डेस्क। गोवन वार्ता
मुंबई :
हीरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) मॅचवीक ९ची सुरुवात मुंबई सिटी एफसी आणि एफसी गोवा या कट्टर प्रतिस्पर्ध्यांच्या लढतीने होईल. मुंबईतील मुंबई फुटबॉल अरेना येथे गुरुवारी (१ डिसेंबर) होणार्‍या या सामन्यात गोलांची बरसात होण्याचा अंदाज आहे. मुंबई सिटी आणि गोवा हे परंपरागत प्रतिस्पर्धी म्हणून प्रसिद्ध आहेत. २०१८-१९ आणि २०२०-२१ या आयएसएल प्ले-ऑफ लढतींमध्येही त्याची प्रचिती आली. उभय संघ आयएसएलमध्ये आजवर २० सामन्यांत आमनेसामने आले. त्यात दोन्ही संघांनी प्रत्येकी ७ सामन्यांत विजय मिळवला आहे. उर्वरित ६ सामने ड्रॉ झाले.
यंदा ८ सामन्यांत २३ गोल करणार्‍या मुंबई सिटीने आयएसएलच्या सुरुवातीच्या ८ लढतींमध्ये सर्वाधिक गोल करण्याचा रेकॉर्ड केला आहे. यापूर्वीचा २२ गोलचा विक्रम त्यांचा प्रतिस्पर्धी एफसी गोवाच्या नावे होता. त्यांनी २०१८-१९ हंगामात तशी करामत साधली होती. त्या मोसमात एफसी गोवाने उपांत्य फेरीत मुंबई सिटीवर विजय मिळवला होता.
यंदाच्या हंगामातील मुंबई सिटीच्या गोलांचे वैशिष्ट्य म्हणजे एकाहून अनेक मॅचविनर आहेत. मागील लढतीत नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसीविरुद्ध मिडफिल्डर अहमद जाहू याने पहिला गोल केला. मोरोक्कोचा हा खेळाडू टीमसाठी गोल करणारा ११वा फुटबॉलर ठरला. जाहू याचे पुढील लक्ष्य आयएसलमध्ये १०० गोल झळकावण्याचे आहे. टिरी याच्यानंतर आयएसएलमधील गोलचे शतक करणारा केवळ दुसरा परदेशी खेळाडू बनण्याची संधी त्याला चालून आली आहे. प्रत्येक सामन्यात आणि सातत्याने गोल होत असल्याने मी आनंदी आहे. आम्ही चांगला होमवर्क करत आहोत. चुका टाळत आहोत. याचा चांगला परिणाम सुरुवातीच्या सामन्यांमध्ये पाहायला मिळत आहे. एफसी गोवा एक टफ संघ आहे. मात्र, विजयी कामगिरीमध्ये सातत्य राखण्याचा प्रयत्न करू, असे मुंबई सिटी एफसीचे मुख्य प्रशिक्षक डेस बकिंगहॅम यांनी सांगितले.
एफसी गोवाची कामगिरी उंचावली असली तरी सातत्य नाही. मागील आठवड्यात बंगळूरू एफसीविरुद्ध त्यांना मात खावी लागली. यंदाच्या हंगामात दुसर्‍यांदा त्यांचा खेळ ढेपाळला. मात्र, अपराजित मुंबई सिटीविरुद्ध विनिंग पॅटर्न पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करताना तीन गुण मिळवण्याला त्यांचे प्राधान्य असेल.
मुंबई सिटी एफसी यंदाच्या हंगामात अपराजित आहे. कमालीचे सातत्य राखताना त्यांनी २०२२-२३ आयएसएल गुणतालिकेत अव्वल स्थान राखले आहे. एफसी गोवा आणि त्यांच्यामध्ये ६ गुणांचा फरक आहे
मुंबई सिटी एफसी आणि एफसी गोवा यांच्यातील सामन्याचे वैशिष्ट्य म्हणजे गोलांची बरसात. आजवरच्या २० लढतीमध्ये प्रत्येक क्लबने प्रत्येकी ६३ गोल लगावले आहेत. त्यामुळे एका पाठोपाठ एक गोल पाहायला मिळतील, अशी अपेक्षा आहे.