एकच दिवसात निवडणूक आयुक्तांची निवड कशी केली?

सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला तिखट सवाल

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
24th November 2022, 11:45 pm
एकच दिवसात निवडणूक आयुक्तांची निवड कशी केली?

नवी दिल्ली :केंद्रीय निवडणूक आयुक्त अरुण गोएल यांच्या नियुक्तीच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा केंद्र सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. निवडणूक आयुक्तपदासाठी एकाच दिवशी मंजुरी, त्याच दिवशी अर्ज आणि त्याच दिवशी नियुक्ती कशी काय केली, असा प्रश्न न्यायालयाने केंद्र सरकारला विचारला आहे. निवडणूक आयुक्तांच्या फाइलने २४ तासांचाही प्रवास केला नसल्याची टिप्पणी न्यायालयाने केली आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर दोन आयुक्तांच्या निवडीमध्ये पारदर्शता आणण्यासंबंधी एक याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेची पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी सुरू आहे. केंद्र सरकारच्या वतीने गुरुवारी निवडणूक आयुक्त अरुण गोएल यांच्या नियुक्तीबाबतचे दस्ताऐवज सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आले. त्यानंतर घटनापीठाने अॅटर्नी जनरल आर. व्यंकटरमणी यांच्याकडे काही प्रश्नच उपस्थित केले.

अॅटर्नी जनरल यांनी घटनापीठाला निवडणूक आयुक्तांच्या निवड प्रक्रियेबाबत माहिती दिली. घटनापीठाने निवड प्रक्रियेबाबत प्रश्न करताना, निवडणूक आयुक्तांच्या निवड प्रक्रियेत अंतिम चार नावे कशी निश्चित होतात, कायदा मंत्रालय कोणते निकष पाहतो, असा प्रश्नही न्यायालयाने विचारला. त्यावेळी अॅटर्नी जनरल यांनी सेवा ज्येष्ठता, वय आदी विविध निकष पाहिले जात असल्याचे म्हटले.

तुम्ही निवड करत असलेल्या व्यक्ती निवडणूक आयुक्त म्हणून सहा वर्ष पूर्ण करत असल्याचे पाहणे आवश्यक होते. मात्र, तुम्ही निवड केलेला एकही उमेदवार कार्यकाळाची सहा वर्ष पूर्ण करत नाही, अशी बाब बाब घटनापीठाने केंद्र सरकारच्या लक्षात आणून दिली आहे.

न्यायमूर्तींचे प्रश्न...

- आम्ही या प्रकरणाची सुनावणी १८ तारखेपासून सुरू केली. त्याच दिवशी तुम्ही फाइल सादर करता आणि पंतप्रधानदेखील त्याच नावाची शिफारस करतात. ही तातडीने कार्यवाही का, असा प्रश्न न्या. जोसेफ यांनी केला.
- तुम्ही सादर केलेल्या म्हणण्यानुसार, १५ मे रोजी जागा रिक्त झाली. तर, १५ मे ते १८ नोव्हेंबर दरम्यान तुम्ही (केंद्र सरकार) काय केले, याची माहिती मिळेल का? सरकारने एकाच दिवसात वेगाने नियुक्ती कशी केली, असा प्रश्न न्या. रस्तोगी यांनी केला.
- एवढ्या पात्र उमेदवारांमधून एका नावाची निवड कशी होते, हे स्पष्ट सांगावे. आम्ही एखाद्या व्यक्तीविरोधात नसून निवड प्रक्रियेबाबत चिंतेत आहोत, असे न्या. जोसेफ यांनी नियुक्ती प्रक्रियेबाबत म्हटले आहे.

हेही वाचा