घोटाळ्याच्या आरोपाबाबत विजयना पाठवणार नोटीस

मुख्यमंत्री : सरदेसाई लोकांची दिशाभूल करत असल्याचाही आरोप


04th October 2022, 12:40 am
घोटाळ्याच्या आरोपाबाबत विजयना पाठवणार नोटीस

प्रतिनिधी। गोवन वार्ता                         

म्हापसा  : नगरनियोजन खात्यात (टीसीपी) २ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा करणाऱ्या गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांना आपण कायदेशीर नोटीस बजावणार आहोत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.             

  नगरनियोजन खात्याची कोणतीही फाईल कधी​ही थेट मुख्यमंत्र्यांकडे येत नाही. आमदार विजय सरदेसाई काही वर्षे नगरनियोजनमंत्री होते, त्यामुळे त्यांनाही याची कल्पना आहे. परंतु, लोकांची दिशाभूल करण्याच्या हेतूनेच ते ​आपल्यावर, तसेच त्यांच्यानंतर नगरनियोजन मंत्री झालेल्यांवर ​बिनबुडाचे आरोप करत आहेत. सरदेसाई यांनी आमच्यावर केलेले आरोप गंभीर आहेत. त्यामुळेच आम्ही त्यांना कायदेशीर नोटीस बजावणार आहोत, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.      

दरम्यान, आमदार विजय सरदेसाई यांनी काहीच दिवसांपूर्वी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राज्य सरकारने नगरनियोजन कायद्यातील १६ (ब) मधील दुरुस्त्या रद्द करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करत या दुरुस्तीचा फायदा उठवत राज्य सरकारने कोविड महामारी काळात २ हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. गोव्यातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी नगरनियोजन कायद्याच्या कलम १६ (ब) मध्ये दुरुस्ती करण्यात आली होती. ती कायमस्वरूपी नव्हती. परंतु, राज्य सरकारने कोविड महामारीच्या काळात १६ (ब) दुरुस्ती अंतर्गत तब्बल ७,७०० जणांना त्यांच्या जमिनींचे निवासी विभागात रूपांतर करून दिले. हे जमीन रूपांतर म्हणजे तब्बल २ हजार कोटी रुपयांचा घोटाळा आहे, असा दावा त्यांनी केला होता. २०१७ पूर्वी जेव्हा राज्यात भाजपचे सरकार सत्तेवर होते, तेव्हा राज्यातील लोकांची सुमारे ८ कोटी चौरस मीटर एवढी निवासी विभागातील जमीन तत्कालीन सरकारने अनिवासी जमीन ठरवून लोकांवर मोठा अन्याय केला होता. हा अन्याय दूर करण्यासाठीच नगरनियोजन कायद्याच्या कलम १६ (ब) मध्ये दुरुस्ती करण्यात आली होती. आपण नगरनियोजनमंत्री पदावर असताना जमीन विभाग बदलून देण्यासाठी जमीनमालकांकडून पैसे घेऊन भ्रष्टाचार केला असता, तर आतापर्यंत एवढ्यात भाजप सरकारने आपल्याला तुरुंगात टाकले असते.      

आपण नगरनियोजनमंत्री असताना केवळ ३२ जणांना १६ ‘ब’ अंतर्गत जमीन रूपांतर करून दिले होते. जुलै २०१९ पर्यंत आपण केलेले हे बदल जास्त करून धार्मिक संघटनांच्या जमिनीसंबंधीचे होते. परंतु, त्यानंतर भाजप सरकारने कोविड काळात ७,७०० जणांच्या जमिनींचे निवासी विभागात रूपांतर करून २ हजार कोटींचा घोटाळा केला. यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, माजी मंत्री बाबू कवळेकर यांचाही सहभाग आहे, असे विजय सरदेसाई यांनी म्हटले होते.

नोटीस आल्यानंतरच उत्तर देऊ : विजय सरदेसाई

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून नोटीस मिळाल्यानंतर आपण त्यांना उत्तर देऊ. मुख्यमंत्री या नात्याने सरकारातील प्रत्येक खात्याची, तसेच त्यातील भ्रष्टाचाराची जबाबदारी डॉ. प्रमोद सावंत यांच्यावरच येते, अशी प्रतिक्रिया विजय सरदेसाई यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या भ्रष्टाचाराबाबत दिगंबर कामत, मायकल लोबो यांनी काँग्रेसमध्ये असताना आवाज उठवला होता. पण, आता भाजपवासी झाल्याने ते यावर काहीही बोलणार नाहीत, असेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा