गोव्यातून महाराष्ट्रात मद्य नेणाऱ्यांवर यापुढे ‘मोक्का’ !

चेकनाके उभारणार; महाराष्ट्र सरकारचा निर्णय


04th October 2022, 12:02 am
गोव्यातून महाराष्ट्रात मद्य  नेणाऱ्यांवर यापुढे ‘मोक्का’ !

प्रतिनिधी। गोवन वार्ता                  

पणजी : गोव्यातून महाराष्ट्रात मद्य आणणाऱ्यांवर यापुढे ‘मोक्का’ कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचा इशारा महाराष्ट्र सरकारने दिला आहे. गोव्यातून महाराष्ट्रात छुप्या पद्धतीने होणारी मद्याची वाहतूक रोखण्यासाठी गोवा-महाराष्ट्राला जोडणाऱ्या सर्वच लहान-मोठ्या मार्गांवर चेकनाके उभारण्याचा निर्णयही महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.            

गोव्यातून महाराष्ट्रात होणारी अवैध मद्याची वाहतूक गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याला आळा घालण्यासाठीच महाराष्ट्राचे उत्पादन शुल्कमंत्री शंभुराज देसाई यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती उत्पादन शुल्क ​विभागाच्या अ​धिकाऱ्यांनी ​दिली. सरकारच्या या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेशही त्यांनी​ कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना दिले आहेत.

शंभूराज देसाई म्हणाले की, मी यासंदर्भात आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. तीन वेळा जर एकाच व्यक्तीकडून अशा पद्धतीचा गुन्हा घडला तर मोक्का लावता येईल का हे तपासून त्यांच्यावर मोक्का लावला जाईल. गोवा राज्याला त्यांच्या राज्यात परमिट देण्याचा अधिकार आहे. आमच्या राज्यात परमिट देण्याचा अधिकार त्यांना नाही. त्यांनी दारु घ्यायची आहे त्यांनी गोव्यात ती घ्यावी.             

दरम्यान, महाराष्ट्रापेक्षा गोव्यात मद्याचे दर कमी आहेत. याचा फायदा घेण्यासाठी महाराष्ट्रातील अनेकजण गोव्यातून कमी किमतीत मद्याची खरेदी करून छुप्या पद्धतीने ते महाराष्ट्रात नेतात आणि तेथे चढ्या दराने मद्याची विक्री करतात. असे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्याला आळा घालण्याच्या हेतूनेच महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गोव्याला लागून असलेल्या सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांनी सतर्क राहून छुप्या पद्धतीने होणारी मद्य वाहतूक रोखावी आणि दोषींवर कारवाई करावी, असे स्पष्ट आदेश मंत्री देसाई यांनी दिल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

मंत्री शंभुराज देसाई यांच्या सूचना             

गोव्यातून महाराष्ट्रात अवैध मद्याची होणारी तस्करी रोखण्यासाठी कडक तपासणी सुरू करा             

गोवा आणि सिंधुदुर्गला जोडणाऱ्या छोट्या रस्त्यांवरही तात्पुरत्या स्वरूपात चेकनाके उभारा             

मद्य तस्करी करणाऱ्यांविरोधात प्रस्ताव तयार करून तो तत्काळ पोलीस प्रशासनाला पाठवा