अमेरिका नाटोच्या पाठिशी : बायडेन

युक्रेनचा भूभाग व्यापल्याने रशियाला इशारा


01st October 2022, 11:46 pm
अमेरिका नाटोच्या पाठिशी : बायडेन

न्यूज डेस्क । गोवन वार्ता

न्यूयॉर्क : रशियाने युक्रेनचे चार भाग व्यापले आहेत. हे चार भाग रशियाचा औपचारिक भाग असल्याची घोषणा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी केली आहे. त्यानंतर अमेरिका चांगलीच आक्रमक झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना इशारा दिला आहे. नाटो देशांची एक इंचही जमीन ताब्यात घेऊ देणार नसल्याचे बायडेन यांनी म्हटले आहे. पुतिन यांनी गैरसमज करून घेऊ नये, आम्ही नाटोच्या पाठीशी उभे असल्याचे बायडेन यांनी म्हटले आहे.

दरम्यान, अमेरिका पुतिन आणि त्यांच्या धमक्यांना घाबरत नाही. पुतिन हे त्यांच्या शेजाऱ्यांचा प्रदेश ताब्यात घेऊ शकत नाहीत. आम्ही युक्रेनला लष्करी उपकरणे पुरवत राहू. नाटो देशांच्या हद्दीतील प्रत्येक इंच जमिनीचे संरक्षण करण्यासाठी अमेरिका पूर्णपणे तयार असल्याचे बायडेन म्हणाले. युक्रेनचा भूभाग जोडण्याच्या रशियाच्या प्रयत्नांबद्दल बायडेन म्हणाले की, युक्रेनचा सार्वभौम भूभाग जोडण्याच्या रशियाच्या प्रयत्नांचा ‘युनायटेड स्टेट्स’ निषेध करते. रशिया आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करत आहे. मी आंतरराष्ट्रीय समुदायाच्या सर्व सदस्यांना विनंती करतो की, त्यांनी रशियाला जोडण्याचा बेकायदेशीर प्रयत्न नाकारावा. जोपर्यंत आवश्यक असेल तोपर्यंत युक्रेनच्या लोकांसोबत उभे राहावे असेही बायडेन म्हणाले.

रशियाने युक्रेनच्या चार क्षेत्रांवर कब्जा केला

२३ ते २७ सप्टेंबर दरम्यान रशियाने डोनेत्स्क, लुहान्स्का, झापोरिझिया आणि खेरसन या युक्रेनच्या चार प्रदेशांवर कब्जा केला आहे. या चार प्रदेशातील बहुतांश लोकांनी रशियासोबत येण्याच्या बाजूने मतदान केल्याचा दावा रशियाने केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डोनेत्स्कमध्ये ९९.२ टक्के, लुहान्स्कमध्ये ९८.४ टक्के, झापोरिझियामध्ये ९३.१ टक्के आणि खेरसनमध्ये ८७ टक्के लोकांनी रशियासोबत जाण्याच्या बाजूने मतदान केल्याचा दावा रशियाने केला आहे.

युक्रेनने नाटोकडे अर्ज केला

रशियाने युक्रेनच्या चार भागांवर कब्जा केल्यानंतर युक्रेनने नाटो देशांकडे अर्ज केला होता. त्यानंतर अमेरिकेने रशियाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. दुसरीकडे, युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी रशियाचे वर्णन ‘दहशतवादी देश’ असे केले आहे. युक्रेनने नाटो देशांच्या यादीत सामील होण्यासाठी आपले प्रयत्न तीव्र केले आहेत.