संशयित स्टीव्हला आज हैदराबादला नेणार

म्हापसा न्यायालयाकडून ट्रांझिट रिमांड मंजूर

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
23rd September 2022, 01:17 Hrs
संशयित स्टीव्हला आज हैदराबादला नेणार

म्हापसा : आंतरराज्य ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली वागातोर-हणजूण येथील हिलटॉप क्लबचा मालक जॉन स्टीफन डिसोझा ऊर्फ स्टीव्ह याला म्हापसा न्यायालयाने दोन दिवसांचा ट्रांझिट रिमांड मंजूर केला अाहे. त्यामुळे तेलंगणा पोलीस शुक्रवारी त्याला हैदराबादला घेऊन जाणार आहेत. संशयित वैद्यकीयदृष्ट्या प्रवास करण्यास फिट आहे, पण त्याला हवाईमार्गेच घेऊन जावे, असा आदेशही न्यायालयाने तेलंगणा पोलिसांना दिला आहे.
स्टीव्हची विद्यमान वैद्यकीय स्थिती पाहून त्यास हैदराबादला नेताना प्रवासादरम्यान वैद्यकीय नियमांचे पालन करावे. शनिवार, २४ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत त्याला हैदराबाद प्रथम श्रेणी न्यायालयासमोर उभे करावे, असे निर्देशही न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. बुधवारी सकाळी तेलंगणा पोलिसांनी स्टीव्ह याला त्यांच्या राहत्या घरून अटक केली होती. त्यानंतर त्याला हैदराबाद येथे नेण्यास परवानगी मागणारा ट्रांझिट रिमांड अर्ज पोलिसांनी म्हापसा प्रथमवर्ग न्यायालयात दाखल केला होता. त्यावर गुरुवारी सुनावणी झाली. पण, संशयिताची प्रकृती खालावल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा इस्पितळात दाखल केले होते. त्याच्या वैद्यकीय अहवाल सादर करण्याचा आदेश देत न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली होती. गुरुवारी संध्याकाळी या अर्जावर पुढील सुनावणी झाली. स्टीव्ह याची गुरुवारी सकाळी गोमेकॉत वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यामध्ये स्टीव्हची प्रकृती चांगली असल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला. हा अहवाल तेलंगणा पोलिसांनी न्यायालयात सादर केला. त्यानुसार न्यायालयाने ट्रांझिट रिमांड मंजूर केला.

संशयिताला न्यायालयातच कोसळला!

न्यायालयात सुनावणीवेळी स्टीव्ह हजर होता. युक्तिवाद सुरू असताना बाकावरच त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले व तो बाकावरच चक्कर येऊन कोसळला. पोलीस व इतरांनी त्यांची विचारपूस केली. काही वेळाने ते शुद्धीवर आले. नंतर त्याला रुग्णवाहिकेतून जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले.

ड्रग्ज तस्करी प्रकरणी तेलंगणा पोलिसांनी हणजूण येथील प्रीतेश बोरकर ऊर्फ काली (३६) याला अटक केली आहे. त्याने हैदराबाद येथील मेट्रोपॉलिटन सत्र न्यायालयात दाखल केलेला जामीन अर्ज न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावला.