‘हास्यदूत’ राजू श्रीवास्तवकडे २० कोटींची संपत्ती

|
23rd September 2022, 10:02 Hrs
‘हास्यदूत’ राजू श्रीवास्तवकडे २० कोटींची संपत्ती

प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या निधनाची अधिकृत घोषणा केली. राजू श्रीवास्तव यांच्या निधनाचे वृत्त आल्यापासून लोकांनी त्यांना मोठ्या प्रमाणावर श्रद्धांजली दिली. राजू श्रीवास्तव यांनी रंगमंचावर आणि चित्रपटांमध्ये कॉमेडी करून नाव, प्रसिद्धी आणि कोट्यवधीची संपत्ती कमावली आहे. राजू श्रीवास्तव यांची कमाई आणि एकूण संपत्ती जाणून घेऊया.
कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले. १० ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तव यांना जिममध्ये व्यायाम करत असताना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना दिल्ली एम्समध्ये दाखल करण्यात आले. सुमारे दीड महिन्यापासून रुग्णालयात दाखल असलेल्या राजू श्रीवास्तव यांच्यावर उपचार सुरू होते. मिळालेल्या माहितीनुसार, ते व्हेंटिलेटरवर जीवन-मरणाशी झुंज देत होते. मात्र, बुधवारी राजू श्रीवास्तव यांचे वयाच्या ५८ व्या वर्षी दिल्ली एम्समध्ये निधन झाले.
राजू श्रीवास्तव यांची कारकीर्द
कॉमेडियन राजू श्रीवास्तव हे उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील रहिवासी होते. राजू यांचा जन्म २५ डिसेंबर १९६३ रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. राजू यांचे वडील रमेशचंद्र श्रीवास्तव हे कवी होते, जे बलाई काका म्हणून प्रसिद्ध होते. राजू श्रीवास्तव यांना लहानपणापासूनच मिमिक्रीची आवड होती. तो अनेकदा अमिताभ बच्चन यांची नक्कल करत असे. पुढे या कौशल्याला त्यांनी आपले करिअर बनवले.
कॉमेडियन बनण्याचा प्रवास
लहानपणी त्यांनी कॉमेडियन बनण्याचे स्वप्न पाहिले आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राजू श्रीवास्तव यांनी अनेक स्टेज शो, चित्रपट आणि टीव्ही कार्यक्रमांमध्ये काम केले. कामाच्या शोधात मुंबईत आल्यावर त्यांनी अनेक वर्षे रिक्षा चालवून आपला खर्च उचलला.
राजू श्रीवास्तव यांचे कुटुंब
१९९३ मध्ये त्यांनी शिखासोबत लग्न केले. राजू आणि शिखा यांना दोन मुले आहेत. राजूच्या मुलीचे नाव अंतरा श्रीवास्तव आणि मुलाचे नाव आयुष्मान श्रीवास्तव आहे. राजू श्रीवास्तव यांचे कुटुंब लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करतात.
ऑटो चालवून उदरनिर्वाह केला
मुंबईत आल्यावर राजू श्रीवास्तव यांच्याकडे राहायला घर नव्हते, जेवायला पैसे नव्हते. त्यांनी कसे तरी ऑटो चालवून आपला उदरनिर्वाह केला आणि एके दिवशी ऑटोमध्ये बसलेल्या एका प्रवाशाने राजूला त्यांच्या शैलीने प्रभावित केले आणि त्याला स्टेज परफॉर्मन्स देण्यास सांगितले. यानंतर राजू यांनी स्टेज परफॉर्मन्स देण्यास सुरुवात केली आणि त्यासाठी त्यांना ५० रुपये मिळायचे. याच दरम्यान त्यांची लोकांशी ओळख झाली आणि त्यांना काही ऑफर्स मिळू लागल्या. यानंतर राजू यांनी दूरदर्शनच्या टी टाइम मनोरंजनापासून ते द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजपर्यंत आपली प्रतिभा लोकांना दाखवली. लाफ्टर चॅलेंजमध्ये त्यांची गजोधर भैया ही व्यक्तिरेखा खूप लोकप्रिय झाली. याशिवाय राजू श्रीवास्तव यांनी अनेक मोठ्या कॉमेडी शो आणि अनेक चित्रपटांमध्ये काम केले आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील सत्य प्रकाश श्रीवास्तव राजू श्रीवास्तव आणि गजोधर भैय्या यांसारख्या नावांनी लोकांमध्ये प्रसिद्ध झाले.
कार संग्रह आणि घर
राजू श्रीवास्तव यांचे कार कलेक्शन फार मोठे नाही पण त्यांच्याकडे चांगल्या आणि आलिशान कार आहेत. राजू यांच्या कार कलेक्शनमध्ये इनोव्हा कार, बीएमडब्ल्यू सारख्या महागड्या वाहनांचा समावेश आहे. कानपूरमध्ये त्यांचे एक आलिशान घर आहे.
कमाई आणि एकूण संपत्ती
मिळालेल्या माहितीनुसार, राजू श्रीवास्तव एका स्टेज शोसाठी ४ ते ५ लाख रुपये घेत होते. जाहिरात, होस्टिंग आणि चित्रपटातूनही त्यांनी भरपूर कमाई केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजू श्रीवास्तव सुमारे १५ ते २० कोटींच्या मालमत्तेचे मालक होते.
राजू श्रीवास्तव यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे तर, राजू श्रीवास्तव यांनी शाहरुख खानच्या बाजीगर, आमदनी अठ्ठणी खर्चा रुपैया, मैं प्रेम की दिवानी हूं आणि कैदी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. राजू श्रीवास्तव टीव्ही शो शक्तीमानमध्ये देखील दिसले होते. पहिल्या सीझनमध्ये काम केल्यानंतर प्रचंड लोकप्रियता मिळवली होती.