कारवर कंटेनर उलटून युवक ठार, चौघे जखमी

धारबांदोडा येथील ‘संजीवनी’समोर अपघात

|
14th August 2022, 11:49 Hrs
कारवर कंटेनर उलटून युवक ठार, चौघे जखमी

प्रतिनिधी । गोवन वार्ता            

फोंडा : धारबांदोडा येथील संजीवनी साखर कारखान्यासमोरील मार्गावर कारवर कंटेनर उलटून झालेल्या अपघातात यश मोहन नाईक (२५) यांचा मृत्यू झाला. अपघातात दत्तराज तुकाराम गावडे (२८, रा. पाल उसगाव), शिवानी राव (रा. पाल उसगाव), कंटेनर चालक कक्रा गौडा आणि आणि क्लिनर देवराज एन. जखमी झाले. चारही जखमींना अधिक उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्गावर बसणाऱ्या गुरांमुळे अपघात घडल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केला आहे.            

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री तिस्क उसगाव येथून मोलेच्या दिशेने कार जात होती. त्यावेळी विरुद्ध दिशेने येणारा कंटेनर कारवर उलटला. अपघातानंतर कारमध्ये तिघेजण अडकून पडले होते. माहिती मिळताच फोंडा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कारमध्ये अडकलेल्या तिघांना बाहेर काढण्यासाठी क्रेन आणण्यात आली. या अपघातात कंटेनरचा चालक आणि क्लिनरही जखमी झाले. सर्व जखमींना अधिक उपचारासाठी गोमेकॉत पाठवण्यात आले आहे. अपघातानंतर फोंडा ते बेळगाव मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प होती. रात्रीच्या वेळी मोकाट गुरे महामार्गावर बसणे नित्याचे झाले आहे. हीच गुरे अनेक छोट्या-मोठ्या अपघातांना कारणीभूत ठरत असतात. हा अपघातही रस्त्यावर बसणाऱ्या गुरांमुळेच घडल्याचा संशय व्यक्त होत आहे. काही दिवसापूर्वी धावत्या कारची धडक रस्त्यावर बसलेल्या गुरांना बसून तिघेजण किरकोळ जखमी झाले होते. फोंडा पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला आहे.