उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना धमकी

लखनऊ पोलिसांकडून अज्ञाताविरुद्ध गुन्हा

|
14th August 2022, 12:18 Hrs
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना धमकी

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ‘औकात दाखवून देण्याची’ आणि ‘बॉम्बने उडवण्याची’ धमकी मिळाली आहे. ही धमकी थेट योगींना दिली नसून हिंदुत्ववादी नेते देवेंद्र तिवारी यांना मिळालेल्या धमकीसोबत देण्यात आली आहे.
यामध्ये त्यांना १५ दिवसांत ठार मारणार असल्याचे सांगितले आहे. देवेंद्र तिवारी यांनी अवैध कत्तलखान्यांविरोधात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर आता त्यांना अज्ञातांकडून ही धमकी मिळाली आहे. लखनऊ पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी २ ऑगस्ट रोजी पोलीस नियंत्रण कक्ष-११२ च्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर मेसेजद्वारे मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकीही आली होती. ज्यामध्ये ‘मी सीएम योगींना तीन दिवसांत बॉम्बने उडवून देईन’, असे लिहिले होते.
पत्रात असेही लिहिले आहे की, तुम्ही लोकांनी आमचे गुरू असदुद्दीन ओवेसी आणि मौलाना मदनी यांना जेवढे रडवले आहे, आम्ही त्या प्रत्येक अश्रूचा बदला घेऊ. आम्ही डरपोक लोक नाही. आम्ही मारण्यापूर्वी सांगतो आणि मारल्यानंतरही सांगू. तुला गो-सेवा करण्याची खूप हौस आहे ना. आता मी तुझे हे भूतही उतरवतो. तुम्हा दोघांच्या चिंध्याही भेटणार नाहीत. बाकीच्या लोकांचे गळे कापले आहेत, तुम्हा दोघांना बॉम्बने उडवून टाकू.