मुंबई इंडियन्स परदेशातही चमकणार

‘एमआय एमिरेट्स’, ‘एमआय केपटाऊन’ संघांची एन्ट्री : लोगो जाहीर

|
11th August 2022, 12:04 Hrs
मुंबई इंडियन्स परदेशातही चमकणार

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)चे जेतेपद पाचवेळा जिंकणारी मुंबई इंडियन्स (एमआय) फ्रँचायझी आता परदेशी लीगमध्येही चमक दाखवणार आहे. एमआय फ्रँचायझीचे मालक रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने युएई आणि दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० लीगमध्ये दोन संघ विकत घेतले आहेत. या दोन्ही संघांना रिलायन्स इंडस्ट्रीजने यापूर्वीच खरेदी केले असून एमआय फ्रँचायझीने या दोन्ही संघांची नावे आणि लोगो जाहीर केले आहेत. यासोबतच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत नाव आणि लोगोही लॉन्च केला आहे.
हे दोन्ही संघ युएई टी-२० लीग आणि दक्षिण आफ्रिका टी-२० लीगममध्ये खेळणार आहेत. एमआय फ्रँचायझीने युएईच्या टी-२० लीगमध्ये त्यांच्या संघाला ‘एमआय एमिरेट्स’ असे नाव दिले आहे. तर दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० लीगमध्ये संघाचे नाव ‘एमआय केपटाऊन’ असे ठेवण्यात आले आहे. हे दोन्ही संघ आणि आयपीएलचे मुंबई इंडियन्स हे सर्व एकाच ‘एमआय’ कुटुंबाचे भाग आहेत. ही दोन्ही नावे त्या-त्या संघाच्या चाहत्यांसाठी समर्पित करण्यात आली आहेत. दरम्यान, यूएई टी-२० लीग आणि दक्षिण आफ्रिकेतील ट्वेन्टी ट्वेन्टी लीग स्पर्धा पुढच्या वर्षी जानेवारी ते फेब्रुवारीदरम्यान खेळवण्यात येणार आहेत.
मुंबईने पाचवेळा जिंकले आयपीएल विजेतेपद
मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमियर लीगमध्ये पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे. ही सर्व विजेतेपदे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जिंकली आहेत. गेल्या २०२२च्या हंगामात मुंबई संघाने सर्वात वाईट कामगिरी केली आणि हा संघ शेवटच्या क्रमांकावर घरसला. पण, आता चाहत्यांना आशा आहे की पुढच्या म्हणजे २०२३ च्या मोसमात मुंबई सहाव्यांदा विजेतेपद पटकावण्यात यशस्वी होईल.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या लीगमध्ये मुंबई इंडियन्सने केपटाउनमध्ये आपला संघ बनवण्यास पसंती दर्शवली आहे. आयपीएमधील सर्वांत लोकप्रिय असलेल्या चेन्नईच्या फ्रँचायझीला जोहान्सबर्गची फ्रँचायझी मिळवली आहे. दिल्ली कॅपिटल्सचे सहमालक जिंदाल यांचा संघ प्रिटोरियातील सेंच्युरियन हा आहे. जिथे त्याला प्रिटोरिया कॅपिटल्स असे संबोधले जाईल. तसेच संजीव गोएंका यांचा कल डरबनकडे होता. उर्वरित दोन शहरांपैकी सनरायझर्स हैदराबाद पोर्ट एलिझाबेथ असू शकते. तर राजस्थान रॉयल्सलाही पार्लची फ्रँचायझी मिळाली आहे.

आमच्या कुटुंबांमध्ये ‘एमआय एमिरेट्स’ आणि ‘एमआय केप टाउन’चे स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे. आमच्यासाठी मुंबई इंडियन्स क्रिकेटच्या पलीकडे आहे. हे स्वप्न पाहण्याची, निर्भय राहण्याची आणि जीवनात सकारात्मक दृष्टिकोन वाढवण्याच्या क्षमतेचे प्रतीक आहे. मला खात्री आहे की एमआय एमिरेट्स आणि एमआय केप टाऊन दोन्ही समान तत्त्वांचे पालन करतील आणि एमआयचा जागतिक क्रिकेट वारसा आणखी उंचावर नेतील. _ नीता अंबानी, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालिका
...........
मुंबईप्रमाणेच संबंधित देशांतील शहरांच्या नावावरूनच 'एमआय एमिरेट्स' आणि 'एमआय केपटाऊन' अशी नावे संघांना देण्यात आली आहेत. जगभरातील टी-२० लीगमध्ये मुंबई इंडियन्सची वेगळी ओळख आहे. त्याचप्रमाणे या दोन संघांनाही आता वेगळी ओळख मिळणार आहे.