आशिया कप खेळण्यास राहुलची टांगती तलवार

एनसीए चाचणीत अपयशी ठरल्यास होणार संघाबाहेर


11th August 2022, 12:02 am
आशिया कप खेळण्यास राहुलची टांगती तलवार

केएल राहुल

दुबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आगामी आशिया चषकासाठी टीम इंडियामध्ये केएल राहुलचा समावेश केला अाहे. मात्र, अद्यापही त्याच्या खेळावर शंका उपस्थित केली जात आहे. शस्त्रक्रीयेनंतर राहुल पुनर्वसनाच्या टप्प्यातून जात आहे. त्याची प्रगती पाहून निवडकर्त्यांना आनंद झाला आहे. परंतु, राहुलने पुनरागमन करण्यासाठी आवश्यक असलेली फिटनेस चाचणी अद्याप उत्तीर्ण केलेली नाही. येत्या काही दिवसांत राहुलची एनसीएमध्ये चाचणी होणार आहे. या चाचणीत तो अपयशी ठरल्यास आगामी आशिया चषक खेळण्यास साशंकता व्यक्त केली जात आहे.
बीसीसीआयने युएईमध्ये २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया कप टी-२० साठी ‍१५ सदस्यीय भारतीय संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहली आणि केएल राहुलचे संघात पुनरागमन झाले आहे. राहुल आयपीएल २०२२ नंतर एकही सामना खेळू शकला नाही. यापूर्वी दुखापतीमुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. राहुल वेस्ट इंडिज दौऱ्यावर टी-२० मालिकेत खेळेल अशी अपेक्षा होती. मात्र, करोना पॉझिटिव्ह असल्याने तो मैदानात उतरू शकला नाही. आता त्याला पुन्हा एकदा टी-२० आशिया कप २०२२ साठी टीम इंडियामध्ये स्थान देण्यात आले आहे. दरम्यान, टी-२० विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्त्वाची आहे. तत्पूर्वी २८ ऑगस्ट रोजी दुबई येथे भारत आणि पाकिस्तान गट फेरीत एकमेकांशी भिडणार आहे.
अन्यथा श्रेयस अय्यर होणार संघात सामील
बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, केएल राहुल सध्या पूर्णपणे तंदुरुस्त आहे, त्यामुळेच त्याची संघात निवड करण्यात आली आहे. पण, प्रोटोकॉलमुळे त्याला बंगळुरूमध्ये फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे. जर केएल राहुल चाचणीत अपयशी ठरला तर श्रेयस अय्यरला त्याची जागा दिली जाईल. श्रेयसला आधीच आशिया कपसाठी टीम इंडियासोबत स्टँडबाय म्हणून ठेवण्यात आले आहे.

राहुलची टी-२० आंतरराष्ट्रीय कारकीर्द
सलामीवीर फलंदाज केएल राहुलची टी-२०मधील कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. त्याने आयपीएल २०२२ मध्ये ६१६ धावा केल्या होत्या. मात्र, त्याचा संघ लखनौ सुपर जायंट्स अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही. या दिग्गज फलंदाजाचा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५६ सामन्यात ४१च्या सरासरीने १८३१ धावा केल्या आहेत. तसेच २ शतके आणि १६ अर्धशतकेही केली आहेत. यंदा राहुलच्या अनुपस्थितीत टीम इंडियाने सलामीवीर म्हणून ८ खेळाडूंना आजमावले आहे.