राजकीय पक्षाच्या चिन्हावरून वादविवाद वाढवणे योग्य नाही!

शरद पवार यांचा एकनाथ शिंदे यांना सल्ला


10th August 2022, 08:07 pm
राजकीय पक्षाच्या चिन्हावरून वादविवाद वाढवणे योग्य नाही!

मुंबई : धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापनेपासून स्वीकारलेल्या आणि महाराष्ट्राच्या मनात असलेल्या एखाद्या राजकीय पक्षाचे चिन्ह काढून घेणे, त्यातून वादविवाद वाढवणे हे योग्य नाही. जर एकनाथ शिंदे किंवा इतरांना काही वेगळी भूमिका घ्यायची असेल तर ते जरूर स्वतःचा पक्ष काढू शकतात. ते चिन्ह करू शकतात, अशी भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी मांडली आहे.
शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचा? याची लढाई सध्या सर्वोच्च न्यायालयात आणि निवडणूक आयोगापुढे सुरू आहे. यासाठी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमनेसामने आहेत. यातच आता शरद पवार यांनी वरील भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही त्याबाबत सल्ला दिला आहे.
माझे काँग्रेससोबत मतभेद झाले तेव्हा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस हा वेगळा पक्ष काढला. घड्याळ हे वेगळे चिन्ह घेतले. आम्ही त्यांचे चिन्ह मागितले नाही आणि वाद वाढवला नाही. पण काही ना काही तरी करून वाद वाढविण्याची भूमिका कोणी घेत असेल तर लोक त्याला पाठिंबा देणार नाहीत, असे पवार यांनी म्हटले आहे.
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी मध्यंतरी भाषणात स्पष्ट सांगितले की, प्रादेशिक पक्षांना भवितव्य नाही. ते शिल्लक राहणार नाहीत. आमचा एकच पक्ष देशात शिल्लक राहील. नितीश कुमार यांची तक्रार आहे की, भाजप सोबत असलेल्या पक्षांना हळूहळू संपवत आहे. त्याचे उदाहरण म्हणजे पंजाबमधील अकाली दल हा मोठा पक्ष त्यांच्यासोबत होता. तो पक्ष त्यांनी जवळपास संपुष्टात आणला आहे. महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप अनेक वर्ष एकत्र होते. आज शिवसेनेचे विभाजन करून शिवसेना दुबळी कशी करता येईल याची आखणी भारतीय जनता पार्टीने केली. त्याला एकनाथ शिंदे आणि इतर लोकांची मदत झाली. त्यामुळे महाराष्ट्रातील शिवसेनेवर एकप्रकारचा आघात त्यांच्या एकेकाळच्या मित्रपक्षाने केला. हेच चित्र बिहारमध्ये दिसत होते. नितिश कुमार हे लोकमान्यता असलेले नेतृत्व आहे, असेही शरद पवार म्हणाले आहेत.