उगेतील ४५ हजार चौ. मी. सरकारी जमीन हडपली

एसआयटीकडून सहा प्रमुख संशयितांंसह इतरांविरोधात गुन्हा दाखल

|
06th August 2022, 01:18 Hrs
उगेतील ४५ हजार चौ. मी. सरकारी जमीन हडपली


प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : सरकारच्या नावावर असलेल्या उगे-सांगे येथील सुमारे ४५ हजार ३२१ चौरस मीटर जमिनीचा बनावट मालकी व इतर दस्तावेज तयार करून सुमारे २ कोटी ८२ लाख ४६ हजार ५५० रुपयांना विक्री करून सरकारची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) सोशियाद प्राट्योटिका दोस बालडियोस दास नोव्हास कॉन्क्विस्तास सांगे या सोसायटीच्या सहा सदस्यांसह इतरांविरोधात गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे.
या प्रकरणी सांगेचे मामलेदार राजेश साखळकर यांनी तक्रार दाखल केली आहे. याची दखल घेऊन एसआयटीने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. त्यानुसार सोशियाद प्राट्योटिका दोस बालडियोस दास नोव्हास कॉन्क्विस्तास सोसायटीचे जुझे आल्बुकर्क पिंटो (मडगाव), सेड्रिक झेवियर कार्व्हालो (पणजी), जुझे गौविया पिंटो (पणजी), ज्योकीम मोन्तेरो (लोटली), थाॅमस नरोन्हा (पणजी), सिनेझियो आंताव (मडगाव) यांच्यासह इतरांनी हेतुपुरस्सर बनावट दस्तावेज तयार करून सरकारच्या नावावर असलेले भूखंड आपल्या नावावर करून विक्री केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
सरकारने संबंधित भूखंडांविषयी २८ जुलै १९६६ रोजी आणि २ जून १९७७ रोजी दोन वेगवेगळ्या अधिसूचना जारी करून सोसायटीला भाडेतत्त्वावर दिलेली जमीन परत घेतली होती. त्यानंतर ४ जून २०२१ रोजी संबंधित जमीन उपजिल्हाधिकारी आणि सांगे मामलेदाराने आदेश जारी करून सोसायटीचे नाव हटवून सरकारच्या नावावर केली होती. असे असताना सोसायटीच्या सदस्यांनी संबंधित भूखंडाची सुमारे ७१ जणांना विक्री केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
त्यानंतर सांगेच्या मामलेदाराने १४ जुलै २०२२ रोजी सांगे नागरी उपनिबंधकांशी पत्रव्यवहार करून वरील भूखंडासंदर्भात सोसायटीने केलेल्या विक्री करारपत्रांची माहिती मागवून घेतली. उगे-सांगे येथील सर्वे क्रमांक १/३, ८४/०, ८४/१, ३४/१ आणि सर्वे क्रमांक ५२/० या भूखंडातील ४५,३२१ चौरस मीटर जमिनीचा बनावट मालकी व इतर दस्तावेज तयार करून सुमारे २ कोटी ८२ लाख ४६ हजार ५५० रुपयांना विक्री केल्याचे समोर आले आहे. सर्वांत माेठा भूखंड १ हजार ३१५ चौरस मीटर क्षेत्रफळाचा, तर सर्वांत लहान भूखंड १३५ चौरस मीटर क्षेत्रफळाचा विकण्यात आला. मोठ्या भूखंडाची २० लाख रुपयांना, तर लहान भूखंडाची ४७ हजार २५० रुपयांना विक्री केल्याचे समोर आले आहे.