भारत-इंग्लंड आज पहिला टी-२० सामना

|
07th July 2022, 12:39 Hrs
भारत-इंग्लंड आज पहिला टी-२० सामना

साऊथम्पटन : भारत आणि इंग्लंड यांच्यात गुरुवारपासून टी-२० मालिका सुरू होत आहे. एजबॅस्टन कसोटी गमावल्यानंतर टीम इंडिया मालिकेमध्ये पलटवार करण्याचा प्रयत्न करेल. पहिला सामना साऊथम्पटन मध्ये खेळला जाणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा करोनामधून बरा झाला असून या सामन्यात तो नेतृत्व करताना दिसेल. दरम्यान, रोहितने टी-२० मालिकेसाठी जोरदार सराव केला असून आता त्याला मैदानावर परफॉर्मन्स दाखवावा लागेल.
इंग्लंड विरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात टीम इंडिया कुठला संभाव्य संघ उतरणार हा प्रश्न आहे. पहिल्या सामन्यात विराट-पंत आणि बुमराह खेळणार नाहीत. त्यामुळे रोहित शर्मा कुठल्या खेळाडूंना संधी देतो, त्याची उत्सुक्त आहे.
यष्टीरक्षकाची जबाबदारी कार्तिक सांभाळणार?
रोहित शर्मा कॅप्टनच आहे. त्यामुळे तो उद्याच्या सामन्यात खेळेल. पण, त्याचवेळी पुणेकर ऋतुराज गायकवाडला संघातील आपले स्थान गमवावे लागणार आहे. रोहित सोबत इशान किशन सलामीला उतरेल. आयर्लंड विरुद्ध टी-२० मालिका खेळणारा संघ इंग्लंड विरुद्ध मैदानात उतरवला जाईल. दीपक हुड्डाला तिसऱ्या स्थानावर संधी दिली जाऊ शकते. सूर्यकुमार यादवही संघाचा भाग असणार आहे. ऋषभ पंतच्या अनुपस्थित दिनेश कार्तिककडे यष्टीरक्षणाची जबाबदारी असेल. अक्षर पटेलचा ऑलराऊंडर म्हणून संघात समावेश होऊ शकतो. हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार आणि आवेश खान या तिघांना संधी मिळू शकते. उमरान मलिक आणि अर्शदीप सिंह या दोघांपैकी टीम मॅनेजमेंट कोणाला संधी देईल का, हा प्रश्न आहे.

कर्णधार म्हणून परदेशात रोहितचा पहिला सामना
रोहित शर्मा टीम इंडियाचा फुल टाइम कर्णधार बनून सात महिने झाले. पण, या दरम्यान त्याने एकदाही परदेशात भारतीय संघाचे नेतृत्व केलेले नाही. इंग्लंड विरुद्ध टी-२० मालिकेतील पहिला सामना हा परदेशातील कर्णधार म्हणून त्याचा पहिला सामना आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी रोहित शर्माला दुखापत झाली होती. तर एजबॅस्टन कसोटीआधी त्याला करोना झाला होता.
..............
आजचा सामना
भारत-इंग्लंड
स्थळ : साउथॅम्पटन
वेळ : रात्री १०.३० वाजता
थेट प्रक्षेपण : सोनी नेटवर्क स्पोर्ट्स चॅनल