महाराष्ट्रात हिंसक पडसाद, पोलीस सतर्क

शिवसैनिक आक्रमक ; बंडखोर आमदारांच्या विरोधात उतरले रस्त्यावर, सर्वत्र हाय अलर्ट जारी


25th June 2022, 12:40 am
महाराष्ट्रात हिंसक पडसाद, पोलीस सतर्क

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे महाराष्ट्रात हिंसक पडसाद उमटू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र पोलीस सतर्क झाले असून मुंबईसह सर्वत्र हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात दोन तास खलबते झाली.      

शिंदे गटात सहभागी झालेले नेहरुनगर-कुर्लाचे शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले. मुंबईतील त्यांच्या कार्यालयावर चाल करून शिवसैनिकांनी कार्यालयाच्या दर्शनी भागाची तोडफोड केली, तर अहमदनगरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पोस्टरला काळे फासण्यात आले. या घटनांनंतर गृह विभाग दक्ष झाला असून अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. 

बंडखोरांच्या निलंबनासाठी मविआचे डावपेच

एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे निर्माण झालेल्या राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना नेत्यांची शुक्रवारी 'मातोश्री'वर एक महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत सेनेतील बंडखोरी मोडून काढण्याची विस्तृत रणनिती ठरल्याची माहिती मिळाली आहे. बैठकीला उपस्थित सर्वच नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केल्यामुळे राजकीय घडामोडी अधिकच वेगवान होण्याची शक्यता आहे. या बैठकीला शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यासह अजित पवार, शिवसेना खासदार आमदार अनिल देसाई, विनायक राऊत आदी नेते उपस्थित होते. विधान भवनात बंडखोर आमदारांच्या निलंबनाची प्रक्रिया कशी पार पाडावी, तसेच सध्याचा राजकीय घटनाक्रम अधिकाधिक दिवस लांबवून शिंदे गटावर दबाव कसा वाढवावा, या मुद्द्यांवर यावेळी सल्लामसलत करण्यात आली. दोन ते तीन बंडखोर आमदारांना स्वगृही आणण्यात यश आल्यास शिंदे गटाला जबर धक्का बसून त्यांच्यावरील दबाव वाढेल, असा विचारही या बैठकीत मांडण्यात आला.

दरम्यान, या बैठकीनंतर शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना परत आणण्यासाठी शरद पवार मैदानात उतरल्याचा दावा करण्यात येत आहे. 

मुख्यमंत्रिपद माझ्यासाठी गौण!

'मुख्यमंत्र्यांचे वर्षा हे सरकारी निवासस्थान सोडल्यानंतर मला अनेकांचे फोन आले. वर्षा सोडल्यानंतर अनेकांचे मला फोन आले. तुम्ही वर्षा निवासस्थान सोडायला नको होते, असे अनेकजण मला म्हणाले. मी मोह सोडला. जिद्द सोडली नाही,' असेही उद्धव यावेळी म्हणाले.