प्रयागराज हिंसाचारातील सूत्रधाराच्या घरावर बुलडोझर

- बेकायदा बांधकाम : पोलीस बंदोबस्तात कारवाई

Story: प्रयागराज : |
13th June 2022, 12:49 am
प्रयागराज हिंसाचारातील सूत्रधाराच्या घरावर बुलडोझर

प्रयागराज : प्रयागराजमध्ये शुक्रवारी झालेल्या हिंसाचाराच्या घटनेचा सूत्रधार जावेद पंपाच्या घरावर प्रशासनाने रविवारी बुलडोझर चालविला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त होता. जावेदचे घर कारेलीच्या जेके आशियाना परिसरात आहे. पीडीएकडून नकाशा मंजूर न करता जावेदचे घर बेकायदा बांधले होते. यासोबतच अधिकाऱ्यांनी पोलिसांना कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज राहण्यास सांगितले आहे.
प्रयागराज हिंसाचार प्रकरणात मोहम्मद उर्फ ​​जावेद पंप हा मास्टरमाईंड आहे. जावेदचे घर करेलीच्या जेके आशियाना परिसरात आहे. तेथेही पीडीएने सर्वेक्षणाचे काम केले आहे. यासोबतच हिंसाचाराच सहभागी असलेल्या ३७ जणांची नावेही या दोन पानी यादीत आहेत. प्रयागराज अतिरिक्त पोलीस महासंचालक ​​प्रेम प्रकाश यांनी शुक्रवारीच सांगितले होते की, ज्यांनी हिंसाचाराचा कट रचला त्यांची चौकशी केली जात आहे. तपासात ज्यांचा सहभाग असेल, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
वातावरण बिघडविण्याचे प्रयत्न
प्रयागराजमध्ये शुक्रवारी नमाजानंतर झालेल्या गोंधळानंतर पुन्हा एकदा वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. येथील शिवकुटी येथील प्रसिद्ध कोटेश्वर महादेव मंदिराच्या शिवलिंगावर काही अज्ञातांनी अंडी ठेवली होती. ती अंडी एका भक्ताने पाहिली. त्यानंतर त्यांनी पुजार्‍याला सांगितले आणि तेथून अंडी फेकून दिली. मंदिराच्या पुजाऱ्याने ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून धार्मिक उन्माद पसरवल्याचा गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला.