मुसेवाला हत्येप्रकरणी पहिली अटक

- तिहार तुरुंगात रचला गेला कट

Story: दिल्ली : |
01st June 2022, 01:25 am
मुसेवाला हत्येप्रकरणी पहिली अटक

दिल्ली : सुप्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणी मंगळवारी पहिली अटक झाली. पोलिसांनी या प्रकरणी मानसाच्या मनप्रीत सिंग नामक तरुणाला अटक केली. त्याच्यावर मुसेवालावर हल्ला करणाऱ्यांना गाडी व शस्त्र उपलब्ध करवून दिल्याचा आरोप आहे. पोलिसांनी सोमवारीच यासंबंधी उत्तराखंडमधून ६ जणांनाही ताब्यात घेतले होते. त्यात मनप्रीतचा समावेश होता. दुसरीकडे, भटिंडा व फिरोजपूर कारागृहातूनही या प्रकरणी २ संशयितांना रिमांडवर घेण्यात आले आहे. दरम्यान, सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येचा कट तिहार तुरुंगात रचला गेला, अशी माहिती समोर आली आहे.
दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने लॉरेन्सची ५ दिवसांची कोठडी घेतली आहे. आता त्याची तिहारबाहेर चौकशी केली जाईल. तत्पूर्वी, मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी घेणाऱ्या लॉरेन्सने आपले एन्काउंटर होण्याची भीती व्यक्त करत दिल्ली हाय कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यात त्यांनी पंजाब पोलिसांना आपली कोठडी न देण्याची विनंती केली होती. पंजाब सरकारने एडीजीपीपदी मंगळवारी उच्चपदस्थ आयपीएस अधिकारी ईश्वर सिंह यांची नियुक्ती केली. हे पद गत आठवड्याभरापासून रिक्त होते. या काळात मुसेवालाची भरदिवसा हत्या झाली. यामुळे मुख्यमंत्री भगवंत मान यांना चौफेर टीकेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मंगळवारी मान सरकारने एका विशेष आदेशाद्वारे सिंह यांच्या नियुक्तीचे आदेश काढले.
सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येचा कट तिहार तुरुंगात रचला गेला. कुख्यात गँगस्टर लॉरेंस येथेच बंदिस्त आहे. त्याने कॅनडात बसलेल्या गोल्डी बराडच्या मदतीने ही हत्या घडवून आली. यात पंजाबी गायक मनकीरत औलख यांच्या मॅनेजरचाही हात असल्याची चर्चा आहे.