गोवा टायगर कप : नुवेची डॉन बॉस्को ओरेटरीवर मात

|
23rd May 2022, 11:43 Hrs
गोवा टायगर कप : नुवेची डॉन बॉस्को ओरेटरीवर मात

पणजी : पॅरिश युथ नुवने गोवा टायगर कप २०२२ अखिल गोवा आंतरग्राम फुटबॉल स्पर्धेत सोमवारी डॉन बॉस्को ओरेटरी फातोर्डाचा टायब्रेकरवर ९-८ असा पराभव केला. गोवा युनायटेड स्पोर्टस् अकादमी आयोजित या स्पर्धेतील हा सामना रोझरी मैदान नावेली येथे खेळविण्यात आला. निर्धारित वेळेत दोन्ही संघ ३-३ असे बरोबरीत होते.
फ्रान्सिस, सेनफर्ड व निकलाव यांनी नुवेकडून तर डीबीओकडून क्लेन्सियोने दोन तर फ्रान्सिस आंद्रादने एक गोल केला. निर्णायक टायब्रेकरवर नुवेकडून निकलाव, ऍलोयसियस, सेनफर्ड, जोनास, फ्रान्सिस कुलासो व मायरन यांनी तर फ्रान्सिस आंद्राद, क्लेन्सियो, क्लाईव्ह, हॅमस्लॅम व मानुएल यांनी डीबीओकडून गोल केले. रिची याला गोल करता आला नाही. डीबीओचा फ्रान्सिस आंद्राद ‘सामनावीर’ ठरला.
गोवा वेल्हाचा नेरुलवर विजय
गोवा वेल्हा एससीने पोरियट मैदान, कळंगुट येथे झालेल्या सामन्यात युनायटेड क्लब नेरुलवर २-० असा विजय मिळविला. गोवा वेल्हाला भावेश गावस याने सामन्याच्या पाचव्याच मिनिटाला गोल करत आघाडीवर नेले. अर्ध्या तासाचा खेळ झालेला असतानाच फ्रेंकी काब्राल याने गोवा वेल्हाची आघाडी दुप्पट केली. नेरुलने दुसऱ्या सत्रात सुधारित खेळ दाखवला. पण, त्यांचे आघाडीपटू गोल करण्यात कमी पडले. गोवा वेल्हाचा विक्रांत मंगेशकर ‘सामनावीर’ पुरस्काराचा मानकरी ठरला.
बार्देश व्हेटरन्सची आगेकूच
बार्देश व्हेटरन्सने गुस्ताव मोंतेरो मैदान कांदोळी येथील लढतीत मोरजी व्हेटरन्सला २-० असे पराभूत केले. बेनडिक्ट फर्नांडिस याने ३४व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करत गोलकोंडी फोडली. गेविन अरावजो याने दुसरा गोल केला. मोरजीचा चंद्रशेखर शिरोडकर ‘सामनावीर’ पुरस्काराचा मानकरी ठरला.

आजचे सामने
केपे व्हेटरन्स वि. कळंगुट व्हेटरन्स, डॉ. गुस्ताव मोंतेरो मैदान, कांदोळी,
एससी दवर्ली वि. सेंट अँथनी एससी, असोल्डा, रोझरी मैदान, नावेली
अस्नोडा युनायटेड एफसी वि. शापोरा युवक संघ, पोरियट मैदान, कळंगुट